शक्ती तुरा कलेतील 'वाघ' शांत!
रायगड भूषण शाहीर रामचंद्र घाणेकर यांचे निधन
कोकण लोककला क्षेत्रावर शोककळा
चिपळूण : शक्ती तुरा लोककलेत आपल्या पहाडी मधुर आवाजाने आणि जबरदस्त सादरीकरणाने रसिकांच्या मनावर राज्य करणारे, 'शक्ती तुरा कलेतील वाघ' म्हणून ओळखले जाणारे रायगड भूषण पुरस्कारप्राप्त शाहीर रामचंद्र घाणेकर यांचे मंगळवारी (दि. २१) त्यांच्या माणगाव तालुक्यातील पढवण या मूळ गावी अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने कोकणच्या लोककला प्रांगणातील एक मोलाचा हिरा हरपला असून, कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कोकणची लोककला शक्ती तुरा या लोककलेच्या प्रांगणात आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील पढवण हे त्यांचे गाव आहे. याच गावच्या सुपुत्राने या कलेत आपले नाव अजरामर केले. शाहीर रामचंद्र घाणेकर आज आपल्या आठवणी आणि नाव लौकिक सोडून आपल्यातून निधन गेले आहेत. रामचंद्र घाणेकर यांनी शक्ती तुरा कलेत प्रवेश केला त्या दिवसापासून या कलेचा रसिक वर्ग या कलेकडे एवढा आकर्षित झाला की, शाहीर रामचंद्र घाणेकर यांची कोकणात कुठे नाचाची बारी असली की प्रेक्षक गाड्या करून त्यांची बारी पाहण्यासाठी जात होते. एक वेगळ्या पट्टीतील आवाज, उत्कृष्ट काव्य लेखन आणि तेवढे दमदार सादरीकरण यामुळे घाणेकर यांच्या बारीला तुफान गर्दी
होत असे.
त्यांनी अनेक शक्तीवाले शाहीर यांच्या सोबत नाचाच्या बाऱ्या केल्या आहेत. त्यामध्ये चिपळूणचे शाहीर दत्ताराम आयरे, विजय पायकोळी, शंकर जाधव, शंकर भारदे, भिकाजी चोगले, अनिल जाधव असे अनेक शाहीर आणि काही महिला शाहीर यांचा ही समावेश आहे.
मात्र त्यांनी विशेष गीत रचनेच्या माध्यमातून रसिकांना त्यावेळी मंत्रमुग्ध करून टाकले होते. "जाखडीची कला तुम्ही सांभाळून ठेवा".. हे शेवटचे गीत त्यांनी चिपळूण येथे ध्वनिमुद्रित केले होते. त्यांच्या अनेक गवळणी आजही रसिकांच्या आणि नाच प्रेमींच्या तोंडावरती असतात. त्यामध्ये " बोबडी गवळण म्हणते ही काय... "तुला मागून भिजवली पुढून भिजवली पंपाने माझ्या दमवली".. धपकन गवळण पडली यमुनेच्या काठावर.. असे तिकडे चोहिकडे नामाचा गजर होतो.. अशा अनेक गवळणी आणि शास्त्रातील गीते त्यांनी गायली होती.
शक्ती तुरा कलेच्या प्रांगणात हा एक हिरा निर्माण झाला आणि तो चमकून गेला असे आजही प्रेक्षक वर्ग सांगतात. रामचंद्र घाणेकर हे काही दिवस आजारी होते. त्यामुळे त्यांना कार्यक्रम करता येत नव्हते. मात्र त्यांचे शिष्य आपल्या गुरुच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असायचे. या कोकणात त्यांचे अनेक शिष्य आहेत. त्यांनी अनेक कलाकारांना घडविण्याचे मोठे काम केलेले आहे. गेले काही दिवस आजारी असताना मंगळवार दिनांक २१ रोजी त्यांच्या गावी त्यांची प्राणज्योत मावळली. या कलेतील वाघ कायमचा शांत झाला आहे. शाहीर रामचंद्र घाणेकर जेव्हा बारी करायचे तेव्हा अनेक वादंग ही निर्माण होत होते. पण त्या सर्वांना हा वाघ पुरून उरत असे.
गायन शैली आणि द्विअर्थी काव्यरचना यामुळे प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी शेवटपर्यंत अधिराज्य गाजवले होते. समय सूचकता आणि शीघ्र काव्य यामध्ये ते पारंगत होते. त्यांनी अनेक वादक आणि आपल्या नाच शाखांमधून कले बरोबरच माणुसकीची पेरणी केली होती. शक्ती तुरा कलेच्या दुनियेतून बाहेर डोकावताना श्री. घाणेकर म्हणजे एक अभ्यासू , शांत सुस्वभावी व्यक्तीमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. मात्र आज काळाने डाव साधला आणि असा हा महान शाहीर काळाच्या पडद्या आड झाला आहे. मात्र त्यांनी कलेच्या माध्यमातून केलेली साधना आणि घेतलेले परिश्रम निश्चितच रसिक मायबाप कधीच विसरू शकणार नाहीत.
शक्ती तुरा कलेतील कोहिनूर हरा हरपला
शाहीर रामचंद्र घाणेकर यांचे निधन झाले ही बातमीच मनाला चटका देऊन गेली. माझ्या सोबत त्यांनी कार्यक्रम केले होते. एक अभ्यासू शाहीर आणि पहाडी आवाज अशी त्यांची खास ओळख होती. डबल बारी मध्ये सामना रंगतदार करण्यातही त्यांची खुबी होती. मात्र, त्यांच्या आकस्मित जाण्याने शक्ती तुरा कलेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानं त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
श्री. हभप दत्ताराम आयरे
शक्तीवाले शाहीर, वालोपे चिपळूण


Comments
Post a Comment