निसर्गाची अनोखी भेट म्हणजे पावसाळ्यात  उगवलेली अळंबी

चिपळुणात रुचकर चविष्ट  अळंबी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी 

संतोष कुळे 

चिपळूण  :  पावसाळा सुरू झाला की आपल्याला विविध प्रकारच्या रानभाज्या चाखायला मिळतात.  अशीच एक पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या तांबड मातीमध्ये जास्त प्रमाणात उगवणारी वनस्पती म्हणजे अळिंबी.   याला ग्रामीण भाषेमध्ये अलबी असेही म्हटले जाते   भूछञ, धिंगरी नावाने सुध्दा अळिंबी ओळखली जाते. आता पावसाळ्यामध्ये थोड्याच दिवसांमध्ये ही अळिंबी  रानामध्ये मिळणार असून चविष्ट असणारी अळिंबी उगवली असून चिपळूण बाजारात  अळंबी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी झाली होती. 

पावसाळ्यामध्ये सारा निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो.  सारे रानोमाळ हिरवेगार झालेले पहावयास मिळते.   अशा या पावसाळी हंगामामध्ये नैसर्गिकरीत्या काही रानभाज्या वनस्पती उगवतात .  त्या फक्त आपल्याला पावसाळ्यामध्येच दिसतात.  त्यांची चव चाखण्यासाठी आपल्याला दरवर्षी पावसाची वाट पहावी लागते.  अशामध्ये अळंबी नावाची बुरशी गटातील वनस्पती हीचा सुद्धा समावेश होतो.  भूछत्रा सारखी दिसणारी अळिंबी एक निसर्गाची देणं..आहे.

ही अळंबी पावसाळ्यात  नैसर्गिकरित्या उगवली जाते. डोंगराळ भागात ज्या ठिकाणी तांबड मातीचे प्रमाण आहे अशा ठिकाणी ही अळंबी मोठ्या प्रमाणामध्ये उगवते.  संपूर्ण रानामध्ये काही ठिकाणी पांढरी शुभ्र  चादर टाकल्यासारखं दिसून येते . मात्र हिला ग्रामीण भागामध्ये अलबी असे ही संबोधले जाते.  

 शेतकरी रानात गुरे घेऊन  जातात . त्यावेळी  त्यांना रानामध्ये ही अलबी रुजलेली दिसतात . भूछत्रा सारखी असणारी अळंबी तो जमिनीतून अलगद उपटून काढतो   कधी कधी पोताभर सुद्धा अळंबी  सापडते.  मात्र जास्त पाऊस असेल तरी या अळंबीच्या पाकळ्या गळून पडतात . त्यामुळे   ताठ उभी असते तेव्हाच ती काढली जाते.  या अळंबी मध्ये ग्रामीण भागामध्ये एक बारीक प्रकारची सुद्धा अळंबी असते.  त्याला चितळ्या अलबी असे ग्रामीण भाषेत बोलले जाते. 

 याची भाजी आपण जर स्वयंपाक घरामध्ये केली तर ती फार चविष्ट लागत असते.  म्हणजे मटणाच्या तोडीस तोड याची भाजी असल्याने  खवय्ये आवडीने पावसाळ्यात खातात.  यालाच आपण हॉटेलमध्ये मशरूम या नावाने ओळखतो.  ज्यावेळी कधी आपण हॉटेलमध्ये जेवणाचा बेत करण्यासाठी जातो.  त्यावेळी काही लोक मशरूमची भाजी ऑर्डर करतात. मात्र हे मशरूम आहे  म्हणजेच अळंबी आहे ती कृत्रिम रित्या तयार केलेली असते . परंतु नैसर्गिक रित्या पावसाळ्यात उगवलेली अळंबी फारच चविष्ट असते.  पांढरे शुभ्र आणि भूछत्री सारखा आकार तिचा असतो.  पावसाळ्यात एक ठराविक कालावधीमध्ये  ती उपलब्ध होते.  सध्या रानात अळंबी उगवली असून ती शोधण्यासाठी शेतकरी रानोमाळ फिरत आहेत. जास्त अळंबी जमा करून ती बाजारात विकण्यासाठी ठेवत आहेत. 

चिपळूण बाजारात अळंबी घेऊन काही तरुण शेतकरी आले होते. ही अळंबी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अळंबी ३०० रुपये किलो दरानी विकली गेली. पावसात ही अळंबी भेटत असल्याने ती खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती .

 शेतकरी  रानामध्ये शोधून ती अळंबी जमा करतो.  आताच्या नवीन पिढीला हे सर्व नवल वाटेल.  परंतु,  जे लोक गावाकडे राहतात आणि ज्यांचा संपर्क रानात असतो.  अशांना मात्र या अळंबी ची  माहिती आणि तिची चव  सुद्धा जिभेवर रेंगाळत राहते. 

 या रानभाज्या आपल्याला निश्चितच आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक असतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये निरनिराळ्या रानभाज्या उपलब्ध होतात.  त्याच्यामध्ये विशेषतः भारंगी,  टाकला आणि अळू अशा अनेक रान भाज्या उपलब्ध होतात. मात्र, अळंबी ही आपल्याला रानातच मिळू शकते. त्यामुळे सध्या रानात उगवलेल्या अळंबीला चिपळूण बाजारात चांगली मागणी आहे.

Comments