लोटे एमआयडीसीच्या विषारी प्रदूषणामुळे सोनगाव ग्रामस्थांचा संताप 

सोनगाव ग्रामस्थांचा एमपीसीबीच्या चिपळूण कार्यालयावर धडक मोर्चा!

आमच्या मागण्या मान्य करा; अन्यथा येथून हटणार नाही


​चिपळूण : लोटे एमआयडीसीमधील कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे त्रस्त झालेल्या सोनगाव (ता. खेड, जि. रत्नागिरी) ग्रामस्थांनी आज आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) च्या चिपळूण येथील प्रादेशिक कार्यालयावर तीव्र धडक मोर्चा काढला. "सहा कंपन्या बंद करा, तरच आम्ही येथून जाऊ," असा एल्गार पुकारत ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला. यावेळी अधिकारी यांनी  कोणतीच कारवाई केली नसल्याचे उघड झाल्याने अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे सोनगाव ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

​​वारंवार निवेदने  देऊन आणि प्रत्यक्ष भेटून होणाऱ्या प्रदूषणाबाबत चर्चा करूनही सोनगाव येथील ओढ्याला दूषित पाणी सोडले जाते. यावर अधिकारी कोणतीच ठोस  भूमिका घेत नाहीत असे निदर्शनात आले.  दिनांक ७ जुलै २०२६ रोजी लोटे एमआयडीसीमधील 'ए' संपमधून अत्यंत घातक रासायनिक सांडपाणी सोनगावमधून वाहणाऱ्या ओढ्यात सोडण्यात आले होते. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या प्रकारामुळे गावातील शेती, मच्छिमार व्यवसाय आणि दुग्धव्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.  येथील ग्रामस्थ या प्रदूषणामुळे त्रस्त झाले आहेत.

याबाबत ग्रामस्थानी ​ निवेदन दिले होते.  एमपीसीबी चिपळूण येथील अधिकारी यांनी  केवळ दिखाव्यासाठी कागदावर पत्रके काढून कंपन्यांवर कारवाईची औपचारिकता केली असे भासवले.  मात्र प्रत्यक्षात संबंधित कंपन्या राजरोसपणे सुरू असून ओढ्यात आजही विषारी पाणी वाहत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.

​ वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई होत नसल्याने सोनगाव ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थांनी सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी थेट एमपीसीबी चिपळूण कार्यालयावर मोर्चा काढत परिसर ढवळून काढला. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परकर कॉम्प्लेक्स  प्रवेशद्वारा जवळच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी काही लोकप्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या डोळ्यात अधिकारी यांनी  धुळफेक  केल्याचे   त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत येथील अधिकाऱ्यांचा निषेध केला. 

मोर्चातील ​प्रमुख मागण्या:

​ 'ए' संपमधील दोषी कंपन्यांचे उत्पादन तात्काळ प्रत्यक्षपणे बंद करण्यात यावे.

केमिकल प्रादुर्भावामुळे शेतकरी व व्यावसायिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन, संबंधित कंपन्यांकडून तातडीने आर्थिक भरपाई वसूल करून द्यावी.

प्रदूषण तपासणीचे सर्व अहवाल विनाविलंब सोनगाव ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावेत. ज्या सहा कंपन्या आहेत. त्यांना टाळे ठोकावे.अशा मागण्या त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आधीपासूनच ठेवल्या आहेत. ​या आंदोलनादरम्यान आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही सोनगाव ग्रामस्थ इथून हटणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

अधिकाऱ्यांनी आमच्याशी येऊन समोर चर्चा करावी असे  सुचित केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूणचे अधिकारी श्रीपाद कुलकर्णी हे सोनगाव ग्रामस्थांच्या समोर आले. त्यांनी काय कारवाई केले असे ग्रामस्थानी विचारले असता त्यांनी सांगितले की, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनासंदर्भात अहवाल पाठवल्याचे सांगितले.   आपल्या समस्येची पूर्तता करण्यासाठी दोन दिवस द्यावे असे त्यांनी सांगितले.  मात्र यावर सोनगाव  ग्रामस्थ आक्रमक झाले.   आतापर्यंत तुम्ही काय केलेत. निवेदन देऊन किती दिवस झाले.  आमच्या डोळ्यात तुम्ही धुळफेक  करत आम्हाला मूर्ख बनवत आहात. असे सांगत जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. यावेळी  आजच्या आज या गोष्टीचा निर्णय लावा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असे सोनगाव ग्रामस्थानी  ठणकावून अधिकाऱ्यांना सांगितले. 

धडक मोर्चा मध्ये माजी खासदार हुसेनभाई दलवाई, आ. भास्कर जाधव, काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, भरत लब्धे, आणि अनेक संघटनेचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते.  या मोर्चाचे नेतृत्व  शिवसेनेचे विभाग प्रमुख राजू घाग,  उपसरपंच मिलिंद घोरपडे, पंचायत समिती सदस्या रेवती घाग, संदीप घाग, दिलीप घाग, नारायण पवार, नामदेव घाग, विष्णू साळुंखे, ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या.


Comments