चिवेलीत राष्ट्रीय पेयजल योजनेत लाखोंचा अपहार

दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा ग्रामस्थांचा इशारा


चिपळूण : तालुक्यातील चिवेली ग्रामपंचायतीतील राष्ट्रीय पेयजल योजनेत लाखो रुपयांचा अपहार झाला असून या कथित गैरव्यवहाराची तातडीने नि:ष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे तक्रार करूनही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आता विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे धावव घेतली आहे. याबाबत ग्रामस्थांनी चिवेली राष्ट्रीय पेयजल योजनेतील कथित आर्थिक अनियमितता आणि कामातील त्रुटींबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्य यांच्यावर आर्थिक व्यवहारांची देखरेख कामांची प्रत्यक्ष पाहणी करून देताना मंजुरी देणे आणि कामे शासनाच्या नियमानुसार होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. मात्र, या जबाबदाऱ्यांमध्ये गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ग्रामस्थ विद्याधर साळुंखे यांनी या योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा दावा केला आहे. या संदर्भात अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. आता याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्यास आमरण उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

चौकट-

चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या तक्रारीची विभागीय आयुक्तांकडून व्ही.सी.द्वारे सुनावणी चिवेली येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील कथित अनियमिततेसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत कोंकण विभागीय आयुक्त कार्यालयाने १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (V.C.) सुनावणी आयोजित केली आहे. तक्रारदार विद्याधर साळुंखे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही सुनावणी होत असून, या सुनावणीस रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन व विद्यमान कार्यकारी अभियंता, उपअभियंता, चिवेलीचे तत्कालीन व विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी तसेच तांत्रिक चौकशी समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विकास शाखेने संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असून, तक्रारदारालाही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चिवेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या तक्रारीवर विभागीय स्तरावर सुनावणी होत असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, सुनावणीनंतर पुढे कोणती कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments