चिपळूणच्या शालिमार गल्लीत 'रस्त्यावरून तळे'; विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल

नगरपालिकेचे मात्र दुर्लक्ष!


चिपळूण : शहरातील शालिमार गल्लीतील रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने तळे झाल्याचा भास होत आहे. रस्त्यावरून डिबीजे महाविद्यालयातील मुले आणि न्याब आय हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या रुग्णांना मोठा त्रास होत आहे. नॅब हॉस्पिटलच्या कोपऱ्यावरील मोरी बुजल्याने ते गटार सुद्धा भरून पाणी रस्त्यावरती वाहत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे. या प्रभागांतील नगरसेवकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

शालोम हॉटेल ते कराड रोडवरील जुने शालीमार हॉटेल यादरम्यान असणारा रस्ता खराब झाला आहे. सिमेंट काँग्रेट रस्ता असून रस्त्यावर गेल्या वर्षापासून पडलेले खड्डे तसेच आहेत. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यात पाणी साचते. सुमारे एक फुटापर्यंत पाणी खड्ड्यात साचलेले असते. याच रस्त्यावरून नॅब हॉस्पिटलकडे जाणारे दररोजचे रुग्ण आणि डीबीजे महाविद्यालयामध्ये जाणारे विद्यार्थी असून ते रोजच ये जा करीत असतात. या रस्त्याने जाणाऱ्या गाड्यांमुळे त्यांच्या अंगावरती कितीवेळा पाणी उडवण्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस पडला की लगेच या रस्त्यावर पाणी साचते. 

येथील हॉस्पिटलच्या कोपऱ्यावरील मोरी पूर्णतः बुजलेली आहे. त्यामुळे त्या मोरीतून पुढे पाणी जात नाही. ते पाणी संपूर्णपणे रस्त्यावर येते. जोरात पाऊस पडला की सर्व पाणी गटाराच्या जवळ असलेल्या चंडिका माता अपार्टमेंटच्या आवारात जाते. त्यामुळे त्या बिल्डिंगच्या आवारामध्ये ते पाणी साचल्याने बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या रूममध्ये बाथरूम मधून पाणी यायला सुरुवात होते. तेथील रहिवाशांना त्या पाण्याचा मोठा त्रास होतो. गेल्यावर्षी दोनदा अशा घटना घडल्या होत्या. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन ते गटार साफ करण्याची गरज होती. त्या गटारांमध्ये इलेक्ट्रिक सिमेंटचा पोल गेले किती वर्षे पडलेला आहे. त्याला उचलण्याचे काम नगरपालिका करत नाही. या प्रभागमधील नगरसेवक यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Comments