मोबाईलच्या जमान्यात 'बहुरूपी' कलेची कोंडी
पिढ्यानपिढ्यांचे संबंध जपणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ
चिपळूण : वेशभूषा बदलत लोकांचे मनोरंजन करणारी बहुरूपी ही परंपरा आता अस्तित्वाची लढाई लढत आहे. मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे मनोरंजनाची साधने बदलल्याने या कलाकारांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनही बदलला आहे. कधी काळी गावोगावी आदराने पाहिले जाणारे हे बहुरूपी आज समाजात उपेक्षेचे बळी ठरत असून, पोलिसांच्या वेशभूषेमुळे त्यांना अनेकदा संशयाच्या नजरेतून पाहिले जात असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक सणांच्या वेळी येथील पारंपरिक आदिवासी संस्कृतीशी संबंधित अनेक प्रकारच्या कला वापरून बहुरूपी आपली कला सादर करतात. पूर्वी या कलाकारांना सुगीचे दिवस होते; मात्र आता मोबाईलमुळे या कलाकारांची कला लोप पावत चालली असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात बहुरूपी कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली होती. सध्या काळाच्या ओघात ही बहुरूपी कला लोप पावत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक कलाकार हे देवी-देवता, पोलिसांचा वेश करून बाजारपेठेत, दुकानात जाऊन पोलिसी खाक्या दाखवत फिरत असतात. लहान वयापासून बहुरूपी म्हणून गावागावात जातात. वर्षानुवर्षे ते ज्या गावात जातात, तेथील नागरिकांशी त्यांचे दोन ते तीन पिढ्यांपासूनचे संबंध आले असल्याचेही ते सांगतात. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून लहानांपर्यंत त्यांची ओळख असते. तसेच कोणाच्या मुली कोठे दिल्या, कोणाची सासुरवाडी कोठे आहे आदींबाबत माहिती बहुरूपी ठेवत आले असल्याचे या कलाकारांनी सांगितले.
--समाजाचा रोष
मोबाईलच्या रूपात करमणुकीची साधने थेट हातात आल्यामुळे बहुरूपी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोलिसांच्या वेशात येणाऱ्या या कलावंतांना भामटे व फसवेगिरी करणारे लोक समजून त्यांना जनतेच्या रोषालादेखील अनेकदा सामोरे जावे लागते. निरनिराळी सोंगे करणारी ही बहुरूपी जमात आता काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

Comments
Post a Comment