कला की कैफियत?
रत्नागिरीतील सोहळ्यात जाखडीतून उमटले शेतकऱ्यांच्या वेदनेचे स्वर."
चिपळूण : कोकणच्या मातीतील अस्सल लोककला 'नमन' आणि 'जाखडी' हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक न्यायासाठी लढणारे एक प्रबळ व्यासपीठ आहे. रत्नागिरीतील एका कृतज्ञता सोहळ्यात याच लोककलेचा हुंकार उमटला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जाखडी बुवांनी सादर केलेल्या गवळणीतून तातडीने उपाययोजना करण्याची साद घातली."
या कृतज्ञता सोहोळ्याचा उद्देश लोककलावंतांच्यावतीने शासनाचे आभार मानण्याचा असला, तरी जाखडी बुवांनी आपल्या सादरीकरणातून कोकणातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती प्रभावीपणे मांडली. 'द्या हो लक्ष हे आमच्याकडे... शेती खाती पहा माकडं...' या ध्रुवपदाने कोकणातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या अधोरेखित केली. दिवस-रात्र कष्ट करून पिकवलेल्या शेतीवर माकडांसह वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मोठे नुकसान होत असल्याची वेदना गाण्यातून व्यक्त
करण्यात आली. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना महागडी बियाणे, रासायनिक खते आणि मजुरीचा खर्च पेलताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याचे चित्र जाखडीतून उभे करण्यात आले.
'झाली वानर संख्या अति, एका मागून झुंडी येती, भात नाचणी खाऊन जाती...' या ओळींनी कोकणातील शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला. भातासह काकडी, पडवळ, दोडका, चवळी, उडीद, तिळासारखी विविध पिके माकडांच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडत असल्याची भावना कलावंतांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे जाखडी सादर करणारे बहुतांश कलावंत हे स्वतः शेतीशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणात केवळ कलात्मकता नव्हती, तर स्वतःच्या आयुष्यातील अनुभव आणि वेदनाही होत्या. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी शासनापुढे केवळ सांस्कृतिक जतनाची नव्हे, तर शेती व शेतकरी वाचविण्याचीही मागणी केली. शासनाने लोककला प्रकारांना अनुदान योजनेत समाविष्ट करून कलावंतांना आर्थिक आधार दिला असला, तरी शेती टिकली नाही तर या लोककला जिवंत राहणेही कठीण होईल, अशी भावना अनेक कलावंतांनी व्यक्त केली. लोककला आणि शेती यांचे कोकणातील अतूट नाते अधोरेखित करत जाखडीच्या सुरातून बळीराजाच्या वेदना मांडल्या आहेत.

Comments
Post a Comment