वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा'
खेड असगणी गावची लेक साक्षी बुरटे हिची सोलापूरात वारकरी सेवा
सोलापूर : महाराष्ट्राची पवित्र परंपरा असलेल्या श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी तहान-भूक विसरून विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरपूरच्या वाटेने मार्गस्थ होत आहेत. कधी उन्हात तर कधी पावसातून चालणाऱ्या या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक तरुण पुढे येत आहेत. याच मालिकेत खेड तालुक्यातील असगणी गावची सुकन्या आणि सध्या मिरज येथे होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षण घेत असलेली साक्षी संजय बुरटे हिने आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत वारीमध्ये असलेल्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करत विठ्ठल सेवेचा लाभ प्राप्त केला आहे.
खेड तालुक्यातील असगणी गावची सुकन्या आणि सरपंच संजना संजय बुरटे यांची लेक ही सध्या मिरज येथे होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्यांच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या वारकरी आरोग्य तपासणी सेवेत तिने उत्तम कामगिरी बजावली आहे.
सोलापूर जिल्ह्यात मुक्कामी असताना, साक्षी बुरटे हिने आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा आणि कौशल्याचा उपयोग करून घेत सोलापूर येथे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. वारी दरम्यान चालण्यामुळे होणारा थकवा, पाय दुखणे, पोटदुखी, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि रक्तदाब (Blood Pressure) यांसारख्या विविध आजारांनी त्रस्त असलेल्या वारकऱ्यांवर त्यांच्या टीमने तपासणी केली.
वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. या वारकऱ्यांच्या निस्सीम भक्तीमुळेच महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे," असे विचार साक्षी बुरटे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
एक होतकरू तरुणी आणि भावी होमिओपॅथी डॉक्टर म्हणून त्यांनी घेतलेला हा वारीतील आरोग्यसेवेचा वसा प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सोलापूर परिसरातील वारकऱ्यांसह तीच्या गावातूनही आणि सर्वच स्तरातून साक्षी बुरटे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment