विजेच्या तुटलेल्या विद्युतवाहीनीचा शॉक लागून दोन गाभण गाईंचा मृत्यू

 

दापोली : तालुक्यातील मौजे पिसई येथील स्मशानभूमी परिसरात विजेच्या खांबावरील तुटलेल्या विद्युतवाहीनीचा शॉक लागून दोन गाभण गाईंचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २८) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिसई गावातील रहिवासी नारायण भिकू मोरे हे आपली गुरे स्मशानभूमी परिसरात चरावयास घेऊन गेले होते. त्यावेळी परिसरातून जाणाऱ्या तीन-फेज वीजवाहिनीतील क्रमांक १ ची विद्युतवाहिनी तुटून जमिनीवर पडलेली होती. चरत पुढे गेलेल्या दोन गाभण गाईंना त्या तुटलेल्या विद्युतवाहीनीचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

गाई मोठमोठ्याने ओरडत असल्याचे लक्षात येताच नारायण मोरे घटनास्थळी धावले. तेव्हा त्यांना वीजवाहिनी खाली पडलेली दिसली. सुदैवाने त्यांनी गाईंना स्पर्श केला नाही. त्यांनी तत्काळ ही माहिती स्थानिक नागरिकांना दिली. त्यानंतर अजित एसरे यांनी तातडीने डीपीवरील फ्यूज काढून वीजपुरवठा बंद केला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

मृत झालेल्या दोन्ही गाई जर्सी हायब्रीड क्रॉस जातीच्या गाभण होत्या. त्यांची अंदाजे किंमत सुमारे ₹८०,००० इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती पिसईचे पोलीस पाटील, सरपंच, महावितरणचे वायरमन व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तलाठ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आवश्यक तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृत जनावरे मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

या घटनेमुळे परिसरात महावितरणच्या देखभाल व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तुटलेल्या वीजवाहिन्यांची वेळेवर दुरुस्ती करून अशा दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Comments