दापोली येथील शिक्षणतज्ज्ञ संदीप राजपुरे यांना मानद डॉक्टरेट
दिल्लीत पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाकडून प्रतिष्ठेचा सन्मान
शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल
दापोली : कोकणातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ संदीप राजपुरे यांना पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे आयोजित सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना मानपत्र, पदक आणि शाल देऊन गौरविण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महानगरांप्रमाणे दर्जेदार, आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने संदीप राजपुरे यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांनी कोकणातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. शालेय, उच्च, आरोग्य, व्यावसायिक आणि कौशल्याधारित शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली, देवरुख, रत्नागिरी, चिपळूण व पालगड येथे विविध शैक्षणिक संस्था यशस्वीपणे कार्यरत असून त्यामध्ये श्री रामराजे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, श्री रामराजे कॉलेज, श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, श्री रामराजे इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई), मराठा मंदिर सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, आर. आर. वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल, पूज्य साने गुरुजी कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय, देवरुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, मा. मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट, रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच चिपळूण येथील श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंगचा समावेश आहे.
शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाने संदीप राजपुरे यांना हा प्रतिष्ठेचा मानद सन्मान प्रदान केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Comments
Post a Comment