चिपळूणमध्ये NDRFचे पथक दाखल -
संभाव्य पूरग्रस्त भागांची पाहणी
चिपळूण : जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) चे पथक मंगळवार, दि. १ जुलै रोजी रात्री उशिरा चिपळूणमध्ये दाखल झाले. या पथकात ३ अधिकारी, २३ जवान आणि ३ वाहनचालकांचा समावेश असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी हे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
चिपळूणमध्ये दाखल झाल्यानंतर NDRFच्या पथकाने बुधवारी शहरातील संभाव्य पूरग्रस्त आणि अतिजोखमीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. पूरपरिस्थिती उद्भवल्यास बचाव व मदतकार्य प्रभावीपणे राबविता यावे, यासाठी विविध भागांचा आढावा घेऊन आवश्यक नियोजन करण्यात आले.
या पाहणीदरम्यान प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे तसेच महसूल प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते. प्रशासन आणि NDRF यांच्यात समन्वय साधून पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

Comments
Post a Comment