कोकणच्या लाल मातीतून साकारले 'इको-फ्रेंडली' बाप्पा

झरेवाडीच्या कळंबटे बंधूंचा अनोखा प्रयोग



संगमेश्वर  : कोकणात सध्या पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे महत्व अनेक मूर्तीकारांना पटले आहे. ते आपल्या मूर्तीशाळेत विविध प्रयोग करून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करत असतात. अशांपैकीच एक म्हणजे झरेवाडी येथील कळंबटे कुटुंबिय असून त्यांनी लाल मातीतून गणेश मूर्ती तयार केल्या आहेत.

कळंबटे कुटुंबियांची तिसरी पिढी गणेश मूर्तीशाळा चालवते. गणेशमूर्ती तयार करण्याची सुरुवात बाबाजी कळंबटे यांनी केली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव रमेश बाबाजी कळंबटे यांनी ती दुसर्‍या पिढीत सुरू ठेवली. आता त्यांचे दोन पुत्र राहुल आणि रोहित हे ही मूर्तीशाळा पुढे चालवत आहेत. ह्या मूर्तीशाळेचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना फाटा देत पारंपारिक शाडू मातीपासून आणि कोकणातील लाल मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या जातात.       

राहुल आणि रोहित कळंबटे हे दोघेही देवरुखच्या डीकॅड विद्यालयाचे विद्यार्थी. तिथे त्यांनी पेपरपासून मूर्तीकला शिकली होती. त्याचा उपयोग पुढे ह्या व्यवसायात झाल्याचे ते सांगतात. खास कोकणातील लाल चिर्‍याची माती ते मूर्तीकलेसाठी वापरतात. चिरेखाणी ह्या पावसाळ्यात बंद असतात. अशावेळी ह्या खाणींमधील माती कळंबटे मूर्ती तयार करण्यासाठी वापरतात. साधारण ३० टक्के शाडूची माती, ३५ टक्के चिरा खाणीतील लाल माती आणि तितकाच कागदाचा लगदा अशा प्रमाणात सर्व घेऊन त्यात गोंद मिसळून ते आवश्यक तो मातीचा गोळा तयार करतात. गोंद मिसळल्याने त्या मूर्तीला कडकपणा येतो असं ते सांगतात. ह्या मूर्ती वीरघळल्यास अत्यंत सोप्या सतात असे कळंबटे सांगतात. यंदा त्यांनी अशा सुमारे पन्नास पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या आहेत.  

ह्या आधी ते पुर्णपणे शाडू मातीचे गणेश तयार करत होते. पण शाडुमाती ही विरघळत असली तरी ती पुर्णपणे पर्यावरण पूरक नाही. विरघळलेली शाडुमाती अत्यंत चिकट असल्यामुळे तिचा झाडांना काहीही उपयोग होत नाही. शिवाय यंदा पेणहून मागवलेल्या शाडू मातीचे दर वाढले आहेत. तसेच आखाती युद्धामुळे पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी पूर्ण शाडुमातीच्या मूर्त्यांची किम्मत वाढली आहे. आशा मूर्तींच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे कळंबटे बंधू सांगतात. 

गणेश वाहन मूषकाला सन्मान देण्याचा प्रयत्न

कळंबटे कुटुंबिय केवळ गणेश मूर्तींवर प्रयोग करून थांबले नाहीत तर त्यांनी गणेशाचे वाहन असलेल्या उंदीर म्हणजेच मूषक मूर्तींवर प्रयोग केले आहेत. सर्वसाधारणपणे पाहील्यास सर्व मूर्तीकार मूषक हा मुख्य गणेशमूर्तीच्या पाटावरच तयार करतात. पण कळंबटे यांनी मुषकाला सन्मान देत त्याच्या स्वतंत्र मूर्ती तयार केल्या आहेत. स्वतंत्र बैठकीवर हातात मोदक घेतलेल्या रूपातल्या मूषकमूर्ती कळंबटे यांच्या मूर्तीशाळेत घडत आहेत. हा प्रयोग कळंबटे गेली दोन वर्षे करत आहेत. कळंबटे यांच्या मूर्तीशाळेत तयार झालेल्या केवळ मूषक मूर्तींना भाविकांची मोठी पसंती मिळत आहे. गेल्या वर्षी २०० मूषक मूर्ती त्यांनी तयार केल्या होत्या.

Comments