चिपळूणच्या प्रसिद्ध सवतसडा धबधब्याकडे दुर्लक्ष
बिकट वाटेमुळे पर्यटक त्रस्त
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेढे-परशुराम परिसरातील पर्यटकांचे आकर्षण असणारा सवतसडा धबधबा पाऊस सुरू होताच पर्यटकांना खुणावू लागतो. मात्र, धबधब्याकडे जाणारी वाट अत्यंत बिकट, निसरडी आणि झाडाझुडपांनी वेढलेली असल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासकीय व ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचा विकासनिधी परत गेल्याने या प्रमुख पर्यटनस्थळावरील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी कडेला असलेला पेढे-परशुराम परिसरातील पर्यटकांचे आकर्षण असणारा सवतसडा धबधबा पाऊस पडण्यास सुरुवात होताच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. मात्र पर्यटकांचे आकर्षण असणारा हा धबधबा अनेक समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. त्याकडे जाणारी वाट बिकट झाली असून पाखाडीला झाडाझुडपांनी वेढले आहे. यामुळे पर्यटक नाराजी व्यक्त करीत असून पेढे ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.
पाऊस पडण्यास सुरुवात होताच लक्षवेधी ठरणाऱ्या सवतसडा धबधब्याकडे पर्यटकांसह स्थानिकांची पाऊले आपोआप वळतात. त्यामुळे येथे हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्यासह येथील नैसर्गिक वातावरणाचा आनंद लुटतात. असे असताना या धबधब्याकडे जाणारी वाट मात्र बिकट झाली आहे. महामार्गावरून धबधब्याकडे पाऊल टाकताच खड्ड्यांचा सामना करावा लागतो. काही अंतरावर गेल्यावर जुनी पाखाडी मिळते. मात्र तिचे पेव्हर ब्लॉकही निघाले असून या पाखाडीला झाडाझुडपांनी वेढले आहे. त्यामुळे धबधब्यापर्यंत पोहचणे कठीण होत असून भीतीच्या छायेखाली येथून जावे लागत आहे. त्यातच येथे असलेली जुनी व
नादुरुस्त झालेली पाखाडी निसरडी झाली असून त्यावरून पाय घसरून अनेक पर्यटक पडत आहेत. असे असताना पेढे ग्रामपंचायत या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांचे लक्षवेधून घेणारा हा धबधबा समस्यांच्या गर्तेत अडकल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी पर्यटकांमधून होत आहे.
निधी गेला परत
या धबधब्याचे रुपडे पालटण्यासाठी काही वर्षापूर्वी पेढे ग्रामपंचायतीने प्रयत्न केले होते. त्यानुसार शासनाच्या पर्यटन विभागाकडून तब्बल ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र काही कारणांमुळे तो खर्ची न झाल्याने परत गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे हेही दुदैव असल्याचे मानले जात आहे.
मक्याच्या कणसांना मागणी
येथे सुविधांचा अभाव असला तरी मक्याच्या कणसांची विक्री मात्र अनेक ठिकाणी जोरात सुरू आहे. पावलोपावली मक्याची दुकाने असल्याने मके खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसते. त्यामुळे दिवसभरात शेकडो मक्यांची विक्री होऊन हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.
तांत्रिक अडचणींमुळे सुविधा देणे अशक्य
सवतसडा धबधबा उत्तम पर्यटनस्थळ आहे. येथे हंगामात हजारो पर्यटक येतात याची जाणीव ग्रामपंचायतीला आहे. पाखाडीसह अन्य सुविधा द्याव्यात असे आम्हालाही वाटते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य होत नसल्याने पर्यटकांना होणाऱ्या त्रासाची आम्हालाही खंत आहे.
तुषार गमरे
उपसरपंच, पेढे ग्रामपंचायत

Comments
Post a Comment