चिपळुणातून गणेशोत्सवासाठी ५५ एसटी बसेसचे बुकिंग



चिपळूण : काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून त्यासाठी गावच्या दिशेने येणाऱ्या कोकणवासियांचे आतापासून नियोजन सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील कोकणवासियांसाठी चिपळूण आगार प्रशासनाने जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. त्यानुसार ५५ बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे.

दरम्यान, दरवर्षी प्रवाशांची संख्या लक्षात घेता जादा गाड्यांमध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती आगार प्रशानाकडून देण्यात आली आहे. कोकण आणि गणेशोत्सव हे अनोखे नाते असून या वैशिष्ट्यपूर्ण सणाच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य कोकणवासीय गावच्या दिशेने येत असतात. गणेशोत्सवास अद्याप काही दिवसांचा कालावधी असला तरी कोकणवासियांचे गावच्या दिशेने येण्याच्यादृष्टीने आतापासून नियोजन सुरु झाले आहे.

आगार प्रशानसाची स्वतंत्र बैठक

काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण आगार प्रशासनाची स्वतंत्र बैठक पार पडली. त्यात जादा बसेसच्या नियोजनाच्यादृष्टीने महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी आगार प्रशासनाने गणेशोत्सवासाठी आगाऊ बुकिंगसाठी जादा ५५ एसटी बसेसचा समावेश केला आहे.

या गाड्यांच्या आरक्षणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यानंतर आणखी जादा गाड्या आगाऊ बुकिंगसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. ग्रुप बुकिंग प्रवाशांना सोईस्कर पडत असल्याने काही गावातून त्याचेही नियोजन सुरु झाले आहे.

Comments