हभप दत्ताराम आयरे महाराज यांचा श्री सेवा गौरव पुरस्काराने सन्मान
श्री क्षेत्र पंढरपूर विठ्ठल मंदिरात १५ ऑगस्ट रोजी रंगला पुरस्कार सोहळा
चिपळूण : क्षेत्र नामयज्ञ सोहळा ट्रस्ट यांच्यावतीने चिपळूण मधील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प दत्ताराम आयरे महाराज यांना दिनांक १५ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात संत नामदेव महाराज यांचे सोळावे वंशज माधव महाराज नामदास यांच्या हस्ते श्री संत सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. त्यांनी केलेल्या वारकरी संप्रदायातील सेवेचा हा सर्वोच्च सन्मान आहे.
चिपळूण तालुक्यातील वालोपे या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि कीर्तनकार हभप दत्ताराम आयरे म्हणजे लोककला आणि अध्यात्म क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहे. जशी त्यांनी लोकलेतून रसिकांची सेवा केली. अगदी तशीच त्यांनी अध्यात्म आणि वारकरी संस्कृती जपत कीर्तनातून प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे . त्यांच्याकडे दोन्ही क्षेत्रातील गाढा अभ्यास आहे. गेली अनेक वर्ष विठुरायाच्या सेवेत राहून कीर्तन सेवा बजावत आहेत. या सर्वांची दखल घेत श्री क्षेत्र नामयज्ञ सोहळा ट्रस्ट यांच्या वतीने त्यांना नुकताच श्री संत सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार प्रत्यक्ष पंढरपुरात विठू माऊलीच्या साक्षीने देण्यात आला. अनेक वारकरी संप्रदायातील वारकरी यांनी हभप दत्ताराम आयरे यांना पुष्पमाला अर्पण करून त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा ठरला आहे. अनेक जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्री आयरे महाराज यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला अनेक वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार मंडळी उपस्थित होती. श्री क्षेत्र नामयज्ञ सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्ती मुकनाक महाराज, उपाध्यक्ष काशिनाथ शिगवण महाराज आणि कार्याध्यक्ष दत्ताराम आदवडे महाराज यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments
Post a Comment