एसटी महामंडळाची विशेष करारावरील गाड्यांच्या भाड्यात प्रति किलोमीटर २० रुपयांची वाढ!
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नियमित तिकीट दरवाढीपाठोपाठ आता विशेष करारावर (प्रासंगिक करार) दिल्या जाणाऱ्या एसटी बसेसच्या दरांमध्येही मोठी वाढ केली आहे. लग्नसोहळे, धार्मिक यात्रा, पर्यटन आणि विविध कौटुंबिक कार्यक्रमांसाठी एसटी गाडी आरक्षित करणे आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे राहिलेले नाही.
विशेष बुकिंगसाठी आकारले जाणारे प्रति किलोमीटर ५५ रुपयांचे भाडे थेट ७५ रुपयांवर पोहोचले आहे.या भाडेवाढीसोबतच महामंडळाने अनामत रक्कम, ऐनवेळी आरक्षण रद्द करण्याचे शुल्क आणि तासांच्या नियमावलीमध्येही कडक बदल केले आहेत. परिणामी, एकेरी प्रवासासाठी गट आरक्षण करताना नागरिकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार असून, नवीन वीजगाड्यांसाठी (ई-बसेस) स्वतंत्र नियम लागू करण्यात आले आहेत.
दरम्यान, या दरवाढीमध्येही शाळा आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींसाठी दिली जाणारी ५० टक्के सवलत पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहलींना काहीसा दिलासा मिळाला आहे. खासगी वाहतूकदारांच्या मनमानी भाड्याला पर्याय म्हणून नागरिक सुरक्षित एसटी प्रवासाला प्राधान्य देत असतात, परंतु वारंवार होणाऱ्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Comments
Post a Comment