कोकणच्या लोककलेत 'शक्तीतुरा' कलेचे स्थान 'एकदम कडक...'

कलेतील नवीन बदलांना युवा रसिकांची पसंती

आधुनिकतेच्या नावाखाली प्रबोधनाच्या हेतूला बगल




 संतोष कुळे 

चिपळूण : कोकणच्या लोककलेचा मानबिंदू ठरणारी शक्तीतुरा नृत्यकला आहे. संगणकीय युगात सुध्दा या नृत्यकलेने रसिकांची मने जिंकली आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार या कलेत अनेक बदल झाले आहेत. या बदलांचे युवा रसिकांनी स्वागत केले असून पारंपरिक पध्दतीने ही लोककला जोपासणाऱ्या जुन्या शाहिरांना हे बदल स्वीकारताना जड जात आहे. या कलेला आता आधुनिकतेची झालर व अर्थकारणाचा वास लागला आहे. यातूनच प्रबोधनात्मक हेतू गायब  होताना दिसतो. तरीही लाल मातीतील या कलेला रसिकांनी डोक्यावर घेतले आहे.

कोकण हे लोककलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. कोकणातील प्रत्येक सणाला वेगवेगळ्या लोककला सादर केल्या जातात. यामध्ये गणेशोत्सवात गेली अनेक वर्षे 'शक्तीतुरा' म्हणजे कोकणची जाखडी हा लोकनृत्य प्रकार अबाधितपणे सुरू आहे. कोकणच्या लाल मातीतील ही लोककला आता सातासमुद्रापलिकडे जाऊन पोहोचली आहे.

मात्र, या शक्तीतुरा कलेतील मूळ साचा व प्रबोधनाचा हेतू यालाच बगल दिला जात आहे. आधुनिकतेतील बदल स्वीकारून कलेचे सादरीकरण मुंबईसह पुणेसारख्या शहरात केले जात आहे. जून महिन्यापासूनच शक्तीतुरा सामन्यांचे आयोजन केले जात आहे. याला रसिकांनी दाद दिली आहे.

'गणा धाव रे मना पाव रे' हे बोल कानावर पडले की पूर्वीच्या 'बाल्या डान्स'ची झलक डोळ्यासमोर उभी राहते. हाफ चड्डी व रंगीत बनियान असा पोशाख करून शक्ती तुऱ्याचा नाच सादर होत असे. पारंपरिकता या कलेत दिसून येत असे. पूर्वी समाजात शिक्षणाची पुरेशी सोय उपलब्ध नसताना ही कला मोठ्या प्रमाणात सादर केली जात होती. मात्र, मधल्या काळात शक्तीतुरा लोप पावणार की काय? असे सर्वच कलाप्रेमींना वाटत होते. आधुनिकतेच्या काळात शक्तीतुरा कला फक्त जुन्या शाहिरांकडून ऐकायला मिळणार असे वाटत असताना याच कलेला ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून अनेक शाहिरांनी रसिकांच्या पुढे आणले. त्यानंतर मात्र, या जाखडी कलेला एक वेगळेच ग्लॅमर लाभले. या शक्तीतुरा कलेत

वेगवेगळे बदल काळानुसार होत गेले. आकर्षक विद्युत रोषणाई, शास्त्रीय पध्दतीने सुमधुर गायन, ढोलकी वादन, संगीत आणि नृत्यकलेतील बदल यामुळे शक्तीतुरा रसिकांनी डोक्यावर घेतला. आधुनिक बदल करीत शाहीर रामचंद्र घाणेकर, तुकाराम मानकर, वसंत भोईर, शंकर जाधव, एकनाथ माळी,

सखाराम रावणंग, दत्ताराम आयरे अशा अनेक शाहिरांनी कॅसेटच्या माध्यमातून या कलेला घराघरात पोहोचविले. मात्र, सद्यस्थितीत या कलेत अनेक नव्या शाहिरांचा उदय झाला आहे. यात काही महिला शाहीर सुध्दा जाखडीचे कार्यक्रम मुंबईसह ग्रामीण भागात करीत आहे. मात्र, सध्या पुरूष व महिला शक्तीतुरा सामन्यांमुळे अश्लिलता वाढत आहे. त्यामुळे या कलेबाबत दोन वर्ग तयार होत असून युवा रसिक अशा सामन्यांना गर्दी करताना दिसतात. मात्र, अशा सादरीकरणामुळे जाणता रसिकवर्ग या कलेतून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवोदित शाहिरांनी या कलेचे सादरीकरण करताना सामाजिक बदलांचे भान ठेवणे अत्यावश्यक आहे. जुन्या शाहिरांकडून कलेचे पूर्ण ज्ञान व प्रशिक्षण घेऊन कला

सादरीकरण केल्यास दुहेरी संगम साधता येईल. मात्र, मूळ प्रबोधनाचा साचा न ढासळू देता या कलेचे सादरीकरण केले तर कलेचा मूळ हेतू साध्य होऊ शकतो. सध्या शक्तीतुरा सामन्याचे प्रयोग रोजच मुंबईसह पुण्यासारख्या शहरात होत आहेत. पूर्वी ही कला गणेशोत्सवात सादर केली जात असे. मात्र, आता या कलेला व्यवसायाचे

स्वरूप आले असून अर्थकारणाचा वास येत आहे. जाखडी लोककलेचे महत्व अबाधित ठेवण्यासाठी आधुनिकतेबरोबरच पारंपरिक ठेवा जपला पाहिजे. तर भविष्यात येणारी पिढी या कलेच्या प्रेमात पडून शक्तीतुरा कलेचे संवर्धन करतील. लोककलेचा वारसा टिकविण्यासाठी आता जाणकार रसिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.


शक्तीतुरा कलेचा जुना बाज हरवला 

शक्ती तुरा ही कला कोकणाचे वैभव आहे. पूर्वी या कलेत शास्त्र अभ्यास, वेगवेगल्या नाचताना चाली मारणे, पाउंडे मारणे आणि ढोलकीचे वादन यामुळे ही कला नुसते मनोरंजनाचे माध्यम नव्हते तर प्रबोधनाचे साधन होते. आता आधुनिकतेच्या काळात खूप फरक झाला असून उकृष्ट गायन  आणि वादन नाचामध्ये दिसते. परंतु नृत्य हरवले आहे.

ज्येष्ठ शक्तीवाले शाहीर

श्री दत्ताराम आयरे वालोपे चिपळूण

Comments