चिपळुणात संगमेश्वरवासीय सेवा संघाचा दिमाखदार स्नेहमेळावा 

गुणवंतांचा गौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची बहार!



चिपळूण : चिपळुणात संगमेश्वरवासीय सेवा संघाचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. श्री राधाकृष्ण पूजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आणि ढोलकी वादनाच्या सादरीकरणाने या सोहळ्यात विशेष रंग भरले.

यावेळी संस्थापक भिकाजी चौगले, सुभाष साहेब भोजने, उमेश महाडिक, रामदास भोजने, महेश महाडिक, महेश भोजने, मनोहर मिरगल, विजय भोजने तसेच संगमेश्वरवासीय सेवा संघाचे सर्व कमिटी मेंबर्स यांच्या उपस्थितीत पूजन व महाआरती करण्यात आली.

यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट, चिपळूण शाखेचे अध्यक्ष व उद्योजक मनोज भोजने, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगरसेवक अजय भालेकर, उद्योजक मनोज भोजने, नगरसेवक अंकुश आवळे, काणे हॉटेलचे मालक प्रसाद काणे, समाजासाठी देशसेवा केलेले चंद्रकांत महाडिक व रमाकांत कांबळे, शिवशंभो नाट्य नमन मंडळाचे चालक जितेंद्र महाडिक,  सांगितझरा ढोलकी वादनाचे प्रशिक्षक यदुवीर भिकाजी चोगले यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी आमदार  सदानंद चव्हाण यांनी संगमेश्वरवासीय सेवा संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून संघाच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

संगमेश्वरवासीय सेवा संघातर्फे इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी, कलाकार आणि विविध क्षेत्रांत समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सांगितझरा ढोलकी वादनाचे. प्रशिक्षक यदुवीर चोगले यांचे शिष्य शिवम विशाल कांबळे (वय १० वर्षे) याने उत्कृष्ट ढोलकी वादन करून उपस्थितांची वाहवा मिळवली. त्याच्यासोबत सार्थक सचिन भालेकर व हर्ष मंगेश महाडिक यांनी महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, मणिपूर, झारखंड आणि कर्नाटक या विविध राज्यांमध्ये लोककला सादरीकरणातून कोकण विभागाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सेवा संघाचे सचिव विजय भोजने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Comments