श्री गणेश मित्र मंडळ कोळकेवाडी खरवाज धनगरवाडीची  ‘एक वाडी, एक गणपती’ची २९ वर्षांची परंपरा

धनगर बांधवानी दिला समतेचा आणि एकतेचा विचार


चिपळूण :  तालुक्यातील कोळकेवाडी खरवाज  येथील धनगरवाडीच्या श्री गणेश मित्र मंडळाने सामाजिक एकोपा आणि श्रद्धेची अनोखी परंपरा जपत सन १९९७ पासून ‘एक वाडी, एक गणपती’ ही संकल्पना सुरू ठेवली आहे. यंदाही मंडळाच्या वतीने मोठ्या भक्तिभावाने गणरायाचे स्वागत करण्याची तयारी सुरू आहे. कोणत्याही सोयी सुविधा नसताना आणि शिक्षणाचा अभाव असताना एक उच्च विचार २० कुटुंबांनी जपला आहे.

धनगर समाजाची एक वाडी गावापासून उंच डोंगरावर आहे. तिथे पाहिजे तशा अजून सेवा सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र, परिस्थितीशी लढण्याची जिद्द धनगरवाडीतील लोकांकडे आहे. याच लोकांनी १९९७ पासून  गेल्या २९ वर्षे वाडीतील  सर्व कुटुंबे एकत्र येऊन एकाच ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून वाडीतील नागरिकांमध्ये एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होत आहे.


गणेशोत्सव काळात विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपाळांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरतो. पारंपरिक पद्धतीने नाच, आणि गणरायाची आरती, पूजा आणि विविध कार्यक्रम साजरे केले जातात.

‘एक वाडी, एक गणपती’ या संकल्पनेतून एकजूट आणि सामूहिक सहभागाचा संदेश देणाऱ्या श्री गणेश मित्र मंडळाची ही परंपरा परिसरासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. बदलत्या काळातही तब्बल २९ वर्षे ही परंपरा अखंड सुरू ठेवणे हे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आणि ग्रामस्थांचे कौतुकास्पद योगदान आहे.

यासाठी अनंत कोकरे,  बाबू जानकर, दगडू गोरे, अनंत जानकर, गुणाजी जानकर

यांचे मार्गदर्शन लाभते.

यंदाचा गणेशोत्सवही उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

Comments