कलगीतुरा समाज उन्नती मंडळातर्फे युवा शाहीर सुधीर हळदे यांना 'शाहिरी प्रेरणा पुरस्कार' प्रदान
चिपळूणमध्ये लोककलेचा शानदार सोहळा रंगला
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याहस्ते सत्कार
चिपळूण : कलगीतुरा समाज उन्नती मंडळ, चिपळूण यांच्या वतीने लोककला आणि शाहीर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चिपळूण देवखेरकी येथील तुरेवाले युवा शाहीर सुधीर हळदे यांना प्रतिष्ठित 'शाहिरी प्रेरणा पुरस्कार' प्रदान करण्यात आला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या प्रमुख हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला शक्ती तुरा कलेतील अनेक शाहिर यांनी उपस्थिती लावली होती.पारंपरिक लोककला असलेल्या 'कलगीतुरा' संप्रदायाचा वारसा पुढे चालवण्यात आणि तरुणांमध्ये शक्तीतुरा कला जोपासण्यात युवा शाहीर सुधीर हळदे मोलाचे योगदान देत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कलासक्तीचा व लोककलेतील योगदानाचा गौरव करण्यासाठी या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
चिपळूण तालुक्यातील देवखेरकी येथील तुरेवाले शाहीर म्हणून सुधीर हळदे परिचित आहेत. आता पर्यंत अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. नामवंत शक्तीवाले शाहीर यांच्या सोबत त्यांनी जुगल बंदीचे कार्यक्रम करून नाव लौकिक केला आहे. एक सुस्वभावी आणि शिस्त बद्ध कार्यक्रम करणारा शाहीर म्हणून त्यांची ओळख आहे.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रंगलेल्या या लोककलेच्या कार्यक्रमात त्यांना शाहिरी प्रेरणा पुरस्कार देऊन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या कार्यक्रमास कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग जंगम, सचिव वैभव पवार, सल्लागार हभप दत्ताराम आयरे, अभय सहस्त्रबुद्धे, संभाजी तावडे, अशोक वहाळकर, पांडुरंग येसरे, भिकाजी चोगले,दिनेश कुडतुडकर, रवींद्र मटकर, माधव कांबळे, नगरसेवक शुभम पिसे, शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण, विनायक पडवळ, ॲड भाई कुळे, अनिल जाधव, श्री घाणेकर, सर्व पदाधिकारी, लोककलाप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी शाहीर सुधीर हळदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत उपस्थितांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले.

Comments
Post a Comment