बाप्पाच्या स्वागतासाठी संतोष कुळे यांची लेखणीतून गीते सजली
गणरायाच्या नव्या गीतांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद
चिपळूण : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी संपूर्ण राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू असताना, यंदाचा गणेशोत्सव अधिक संगीतप्रद आणि भक्तिमय करण्यासाठी गीतकार संतोष कुळे सज्ज झाले आहेत. त्यांच्या कसलेल्या लेखणीतून यंदाही काही अप्रतिम नवी गणेश गीते साकारली आहेत. या गीताना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
चिपळूण तालुक्यातील बामणोली गावचे सुपुत्र आणि लोककलेचा वसा जपणारे संतोष उर्फ भाई कुळे हे एक हरहुन्नरी कलाकार आहेत. त्यांना लहानपणापासूनच लोककलेचा आवड आहे. त्यांनी नमन, जाखडी, गावचे खेळी, कला जपताना काव्य रचना आणि अभिनय सुद्धा केला आहे. दरवर्षी त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या गणेश आगमनाची गीते आणि गौळण यांच्या रचना श्रोत्यांना ऐकायला मिळतात. यंदाही त्यांची गीते रिलीज झाली असून रसिकांच्या मनाला भावली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या ओघवत्या आणि भावपूर्ण शब्द रचनेने गणेशोत्सवात भक्ति भावाचा जागर करणारे संतोष कुळे, भक्तांसाठी काहीतरी खास घेऊन येतात. त्यांच्या गीतांमधील साधेपणा, गणरायाप्रती असलेली अगाध श्रद्धा आणि उत्सवाची ऊर्जा श्रोत्यांना नेहमीच मंत्रमुग्ध करत असते. यंदा तयार होणारी ही नवी गाणी गणेशभक्तांसाठी पर्वणीच ठरत आहेत. गणरायाच्या रूपाचे वर्णन करणारे गीत " पायी वाजे घुंगरू" बाप्पाचे आगमन गीत "नटली आनंदाने धरती सारी" आणि एक राधेच्या मनाची व्याकुळता सांगणारी गवळण " शोधू कुठे मी तुला कान्हा".. ही गीते यू ट्यूब वर रसिकांना आवडत आहेत. ही गीते शाहीर उमेश कुळे, विश्वजित तांबिटकर, प्रतीक्षा घाणेकर आणि छोटी गायिका परी कोटकर यांनी गायकी आहेत. सुंदर एडिटिंग शैलेश डिंगणकर आणि प्रवाळ कोटकर यांनी केले आहे. कलाकार म्हणून प्राची कोटकर आणि परी कोटकर यांनी अभिनय केला आहे. ही सारी गीते लवकरच रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
गावोगावी ढोल-ताशांच्या गजरात काही दिवसांमध्ये बाप्पाचे आगमन होणार आहे. याच बरोबर संतोष कुळे यांच्या या नव्या गीत निर्मितीमुळे उत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ही नवी गाणी बाप्पाच्या दरबारात आणि घराघरांमध्ये कोणती नवी ऊर्जा निर्माण करतात, याकडे आता तमाम गणेशभक्तांचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment