शिरवली-देवखेरकी प्रकल्पग्रस्तांच्या पाणीप्रश्नावर प्रशासनाची तातडीची बैठक
जि.प.सदस्या शिवानी सावंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
१४ ऑगस्टला संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
चिपळूण :-शिरवली, देवखेरकी, येलोंदेवाडी व नारदखेरकी येथील प्रकल्पग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आता प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.जिल्हा परिषद सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रश्नाची गांभीर्याने मांडणी करून संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पंचायत समिती चिपळूण गटविकास अधिकारी यांच्या दालनामधे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शिरवली, देवखेरकी, येलोंदेवाडी व नारदखेरकी येथील काही घरे लघु पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या पुनर्वसनामध्ये गेलेली आहेत, तर काही घरे अद्याप शिल्लक आहेत. शिल्लक असलेल्या घरांच्या चारही बाजूंना खोदकाम झाल्याने धरणाचे पाणी त्यांच्या घरापर्यंत येत असून या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी या भागातील नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या तीन सार्वजनिक विहिरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या या मूलभूत प्रश्नासाठी शिवानी सावंत यांनी स्थायी समितीत सातत्याने पाठपुरावा करत कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार होणाऱ्या बैठकीस जलसंधारण विभाग व जलसंपदा विभागाचे संबंधित उपअभियंता तसेच प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार असून, प्रकल्पग्रस्तांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पदभार स्वीकारल्यापासून शिवानी सावंत यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असून, देवखेरकी-सुतारवाडी परिसरातील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला वीजपुरवठ्याचा प्रश्नही त्यांच्या पाठपुराव्यामुळे अल्पावधीत मार्गी लागला आहे. त्यामुळे शिरवली-देवखेरकी परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या पाणीप्रश्नावरही या बैठकीत ठोस उपाययोजनेची दिशा निश्चित होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment