रोटरी क्लब ऑफ एस्कॉन प्रो तर्फे श्री. प्रवीण चव्हाण यांना ‘सेवा गौरव पुरस्कार २०२६’

उद्योजक श्री. निलेश चव्हाण यांच्या हस्ते पुणे येथे गौरव

 स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान


चिपळूण  :  तालुक्यातील मार्गताम्हाने येथील श्री. प्रवीण वामनराव चव्हाण हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिका चालक सेवेतून निवृत्त झाले आहेत. सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणे, कर्तव्यदक्षतेने आणि सेवाभावी वृत्तीने कार्य केले. यासोबतच गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी क्लब ऑफ एस्कॉन प्रोतर्फे त्यांना ‘सेवा गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

पुणे येथे आयोजित भव्य सोहळ्यात उद्योजक श्री. निलेश चव्हाण यांच्या हस्ते श्री. प्रवीण चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सौ. नंदिनी निलेश  चव्हाण, रोटरी क्लब ऑफ एस्कॉन प्रोचे अध्यक्ष श्री. संजय रोडे आणि सचिव श्री. राहुल,  पुरकर , श्री महेश मायदेव, श्री शैलेश मोरे, श्री निनाद निलेश चव्हाण, सौ. अंजली काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि सेवाभावी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात प्रवीण चव्हाण यांना ‘सेवा गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले.

श्री. प्रवीण चव्हाण यांनी आपल्या सेवाकाळात जनसेवेला दिलेले सर्वोच्च प्राधान्य, सहकारी कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांमध्ये निर्माण केलेले आदराचे स्थान, कोरोना महामारीच्या काळात बजावलेली कौतुकास्पद सेवा तसेच सामाजिक बांधिलकी जपत गावासाठी दिलेले योगदान यांची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ एस्कॉन प्रोतर्फे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आम्ही वारकरी, एस्कॉनचे वारकरी’ या संकल्पनेवर आधारित एस्कॉन प्रोजेक्ट चा हा वार्षिक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उद्योजक श्री निलेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘थोडे चिंतन, थोडे मंथन आणि भरपूर धमाल’ यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला.

Comments