डीबीजे येथे १३ ऑगस्टला रानभाज्या महोत्सव
रानभाजी प्रदर्शन, विक्रीसह पाककला, भित्तिपत्रक व ‘रील’ स्पर्धेचे आयोजन
चिपळूण : रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य तसेच जैवविविधतेचे संवर्धन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने चिपळूण येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. दातार विज्ञान, डॉ. बेहेरे कला आणि श्री. पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) येथे १३ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री, रानभाजी पाककृती स्पर्धा, भित्तिपत्रक स्पर्धा तसेच ‘रील’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रानभाज्या या निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या पोषणसमृद्ध वनस्पती असून, त्यांच्या माध्यमातून स्थानिक जैवविविधता, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि आरोग्यदायी आहार यांचा परिचय होतो. विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील नैसर्गिक अधिवास, स्थानिक रानभाज्या, त्यांचे पोषणमूल्य आणि पर्यावरणीय महत्त्व यांची माहिती मिळावी, तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रानभाजी पाककृती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी रानभाजीचा समावेश असलेला पदार्थ घरी तयार करून आणणे आवश्यक आहे. त्यासोबत संबंधित पदार्थाची पाककृती तसेच त्यातील पौष्टिक गुणधर्मांची माहिती कागदावर लिहून आणावी लागणार आहे. त्यामुळे पारंपरिक रानभाज्यांपासून तयार होणाऱ्या विविध पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांची माहिती या महोत्सवातून नागरिकांना मिळणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांची ओळख, त्यांचे आरोग्यविषयक फायदे, स्थानिक पातळीवरील उपलब्धता आणि त्यांचे संवर्धन याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चिपळूण तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या महोत्सवाचे आयोजन डीबीजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा एनएसएस विभाग, महिला विकास कक्ष, स्वयंसिद्धा समिती आणि ॲग्रीकल्चर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.महाविद्यालयाचे चेअरमन मंगेश तांबे आणि प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. योगेश आगवेकर, प्रा. सौ. स्वरदा कुलकर्णी, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Comments
Post a Comment