नॅब आय हॉस्पिटलला शासन स्तरावर सर्वतोपरी सहकार्याचे डॉ. विनय नातू यांचे आश्वासन


चिपळूण : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) चिपळूण, जिल्हा शाखा रत्नागिरी संचलित बाई रतनबाई घरडा अंध पुनर्वसन केंद्र व नॅब आय हॉस्पिटलला सिंधुरत्न समृद्धी योजनेचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनयजी नातू यांनी भेट देऊन रुग्णालयाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. तसेच संस्थेसमोरील शासन स्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

       यावेळी नॅब आय हॉस्पिटलचे अध्यक्ष निलेशजी भूरण यांनी डॉ. नातू यांचे स्वागत केले. संस्थेच्या कार्याची माहिती देताना भूरण यांनी सांगितले की, नॅब चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरी ही संस्था १९९४ मध्ये सामाजिक कार्याची आवड असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन स्थापन केली. रत्नागिरी जिल्ह्यातील दृष्टीबाधित व्यक्तींना स्वयंरोजगार, घरकुल, शैक्षणिक व वैद्यकीय मदत तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.

       संस्थेच्या माध्यमातून नॅब आय हॉस्पिटल चालविण्यात येत असून, येथे विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया करण्यात येतात. एनपीसीबी योजनेंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी यांच्या सहकार्याने गरीब व गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा दृष्टी मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे.

         संस्थेने मार्च २०२५ अखेर तब्बल 8 हजार मोफत शस्त्रक्रिया केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मात्र, रुग्णालयाच्या कामकाजाशी संबंधित काही शासन स्तरावरील अडचणीही निलेश भूरण यांनी डॉ. नातू यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

         यावेळी डॉ. विनय नातू यांनी संस्थेचे कार्य आणि रुग्णालयाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळणारी सेवा याबाबत समाधान व्यक्त केले. शासन स्तरावरील प्रलंबित विषय व अडचणी समजून घेत त्यांनी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या सहकार्याने मंत्रालय स्तरावर संबंधित विभागांच्या बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

       दृष्टीबाधित तसेच गरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या नॅब आय हॉस्पिटलच्या कार्याला शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही डॉ. नातू यांनी यावेळी दिली.

        या भेटीवेळी रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे, अमोल भोबस्कर, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर तसेच मुख्यमंत्री पानंद रस्ते योजना अंतर्गत गुहागर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचे सहअध्यक्ष गणेश हळदे उपस्थित होते.

Comments