ज्ञानज्योतीपासून ग्रामविकासाच्या दीपस्तंभापर्यंत!

श्री. विनोद जानू हुंबरे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर



चिपळूण : येथील शिक्षक श्री. विनोद जानू हुंबरे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेत सन २०२६-२७ चा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

 विनोद जानू हुंबरे हे चिपळूण तालुक्यातील पोसरे हुंबरेवाडी येथे चिखलातून उगवलेले एक प्रेरणादायी कमळच होय !!! अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या गुरुजींनी प्राप्त परिस्थितीशी मुकाबला करून एच. एस. सी .डी.एड, बी .ए., बीडए ,एम ए. एज्युकेशन पदवी संपादन केली . बालपणापासून त्यांना शिक्षकी पेशाची आवड होती. वयाच्या विसाव्या वर्षी ते मंडणगड वेळास येथे  उपशिक्षक म्हणून शिक्षण सेवेत रुजू झाले. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा त्यांनी अल्पावधीत उमटविला . वेळास येथे असताना अमोल सोमण यांच्या सहाय्याने संपूर्ण शाळेला स्वतः रंगरंगोटी केली . जिल्हास्तरीय मुलींचा कबड्डीचा संघ , संपूर्ण शाळा सारवण मुक्त करण्यासाठी श्री श्रीपाद त्रैलोक्य यांच्याशी संपर्क साधून भरीव शैक्षणिक देणगी , ग्रामस्थांच्या, पालकांच्या सहकार्याने बेंचेसची उपलब्धता , इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा  , वकृत्व स्पर्धेत तालुकास्तरावरील  यश तसेच वेळास ग्रामपंचायतीचे ग्राम स्वच्छता अभियान, सांस्कृतिक कार्यक्रमातून भरीव शैक्षणिक देणगी मिळविण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे . सात वर्षे सेवा बजावल्यानंतर  त्यांची बदली चिपळूण येथील उमरोली नं.1 या शाळेत झाली.

   येथे आल्यानंतर श्री एकनाथ घाग ,सौ एकता घाग, श्रीमती स्मिता जोगळेकर या सहकाऱ्यांच्या समवेत जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरोली नं. एक शाळेला  " संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान " स्पर्धेत " साने गुरुजी स्वच्छ सुंदर शाळा " पुरस्कार  कोकण विभागात प्रथम मिळवून , दीड लाख रुपये निधी मिळवण्यात अनमोल भूमिका पार पाडली. या स्पर्धेत प्रभाग, विभाग, तालुका, जिल्हा व कोकण विभागातील सर्व बक्षीसे मिळविली. उमरोली सरपंच श्री संतोषशेठ भडवळकर, श्री अशोकशेठ  भडवळकर ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला. या गावचे व शाळेचे सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर प्रक्षेपण होऊन  "स्वच्छ वाटा घेऊ खराटा ... हे सुंदर गीत प्रक्षेपित झाले. तालुका पातळीवर शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये प्रथम पारितोषिक ,साने गुरुजी ज्ञानप्रबोधिनी तर्फे कलाशिक्षक पुरस्कार, रंगबहार तर्फे उपक्रमशील शिक्षक पुरस्कार ,भारतीय अकादमी तर्फे राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार ,राष्ट्रीय युवक कल्याण केंद्र महाराष्ट्र टीम मधून केरळ येथे एकात्मिक शिबिरामध्ये सहभाग घेतला .

 यानंतर त्यांची बदली पोसरे वस्तीशाळेमध्ये झाली. वस्ती शाळेचे नियमित शाळेमध्ये रूपांतर करून अद्यावत अशी सर्वशिक्षा अभियान अंतर्गत देखणी इमारत बांधून या शाळेला सुमारे ऐंशी हजार रुपये शैक्षणिक उठाव करून या शाळेचा कायापालट केला .या सर्वांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ,तालुका चिपळूण शाखेतर्फे सन 2012 -13 ला शैक्षणिक कार्य , सहशालेय उपक्रम , सामाजिक व राष्ट्रीय उपक्रम ,शाळा स्थरावर  राबविलेले नाविन्यपूर्ण  उपक्रमाबाबत सामाजिक जाणीवेतून सेवा बजावत असल्याबद्दल सन्मानपूर्वक  " गुणवंत शिक्षक पुरस्कार " चिपळूण संगमेश्वर चे आमदार माननीय श्री सदानंद चव्हाण साहेब व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

    तेथून त्यांची बदली 2014 साली गोंधळे शाळेत  पदवीधर शिक्षक म्हणून झाली . या गावचे शिक्षण प्रेमी श्री मनोहर सिताराम गोंधळेकर व सौ .स्मिता मनोहर गोंधळेकर यांच्याशी संपर्क साधून शाळेमध्ये विविध भौतिक सुविधा परिपूर्ण केल्या . यामध्ये संपूर्ण शाळेला स्पार्टेक्स, आधुनिक तंत्रज्ञानासाठी विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी पाच टॅब , एलसीडी प्रोजेक्टर ,संगणक संच ,दूरदर्शन संच , कराओके साऊंड सिस्टिम ,२५ खुर्च्या , विविध नेत्यांचे 25 फोटो ,हार्मोनियम पेटी व तबला संच , विविध वैज्ञानिकांची पुस्तके ,पाणी पिण्यासाठी जलकुंभ , आकर्षक किल्ल्याची निर्मिती , सावित्रीबाई दत्तक पालक योजनेचा तीन केसेस , काच फलक , तसेच विद्यमान सरपंच श्री भूषणजी खेडेकर यांच्या माध्यमातून ऑफिस कपाट व कलर प्रिंटर , संगणक ट्रॉली इत्यादी साधने मिळविली. पालक ग्रामस्थ व सहकाऱ्यांच्या मदतीने सन 2020- 21 गोंधळे शाळेला जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला !!! स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा ११७ वर्षाची असताना श्री समीर अनिरुद्ध वैद्य व त्यांच्या पत्नीच्या मदतीने शाळेची सहा गुंठे जागा बक्षीस पत्राने  जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे . !!! आज पर्यंत अनेक शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले !!! यांचे समाधान  त्यांच्या चेहऱ्यावर दिसते !!! गोंधळे गावाची ऐतिहासिक परंपरा व स्वातंत्र्य काळातील शाळेची ओळख यांचा सह्याद्री वाहिनीवर  '. "" सफर महाराष्ट्राची , वाट एक आडवळणाची "" हा कार्यक्रम प्रक्षेपित झाला .कै. श्री भालचंद्र गोंधळेकर  यांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी 20,000 /- हजाराची देणगी बँकेत कायम ठेवून येणाऱ्या व्याजातून वर्षभरात नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जातात. फक्त शाळा आदर्श न करता विद्यार्थ्यां मध्ये गुणात्मक व स्पर्धात्मक भावना वाढीस लागलेली आहे . जिल्हा परिषदेने राबवलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये सात विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर  निवड झाली . त्यामध्ये कुमार सोहम सुनील बारे याची भारतीय अंतराळ संशोधन केंद्र इस्रो संस्थेस बेंगलोर येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड ,हा गुरुजन च्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा व संस्मरणीय क्षण होय !!! त्याचबरोबर रत्नागिरी टॅलेंट सर्च या परीक्षेमध्ये पाच हजार रुपयाची विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून दिली. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले . श्री अनंत गोंधळेकर यांच्या देणगीने शाळेला दोनवली केंद्रामध्ये प्रथम सीसीटीव्ही बसवण्याचा मान शाळेला प्राप्त झाला .  या शाळेतील माजी शिक्षक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी  श्री संजय मोरे यांनी CCTV स्क्रीन देऊन शाळेची अत्यावश्यक गरज पूर्ण केली .गेल्या 14 वर्षाच्या कालावधीत गोंधळे शाळेला सुमारे 19 लाखांचा शैक्षणिक उठाव प्राप्त  झाला. या साठी गावातील सर्व नागरिकांची व पदाधिकारी  ,मान्यवर मंडळींची त्यांना मोठी साथ मिळाली . कै. अरविंद अनंत झगडे यांच्या स्मरणात त्यांचे चिरंजीव  सूरज झगडे यांनी गेली दोन वर्ष चंदनाच्या झाडांचे मोफत केलेले वाटप हा अद्वितीय व अनोखा  क्षण अनुभवण्याचे भाग्य त्यांना मिळाले !!! आज पर्यंत त्यांच्या माध्यमातून जिल्हा स्तरापर्यंत मुलांना खेळण्याची संधी , सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ,इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा, पाढे पाठांतर स्पर्धा, गीताई पाठांतर ,मनाचे श्लोक पाठांतर ,देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, रंगभरण स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम, वनभोजन , शैक्षणिक सहली, वृक्षारोपण व संवर्धन ,सागरी कासव संवर्धन , ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता , व्यसनमुक्ती ,कुटुंब नियोजन, साक्षरता अभियान ,पाणी आडवा ,पाणी जिरवा यासाठी वनराई बंधारे बांधणे ,औषधी वनस्पतीची लागवड , गांडूळ खत प्रकल्प , गप्पी मासे प्रकल्प, इत्यादी कामे त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन यशस्वीपणे राबविली आहेत.

    नुकतीच त्यांची बदली चिवेली वरची शाळेमध्ये झालेली असून त्या गावातील  सर्व मुलांना मोफत दप्तरे , लेखन साहित्य छत्र्यांचे वाटप करून 15 ऑगस्ट च्या सभेमध्ये ग्रामस्थांकरवी एक कपाट मिळवून देण्यात ते यशस्वी झाले !!!

  दुसऱ्यांच्या मदतीसाठी हातचे काम पुढ्यात टाकून प्रथम मदतीला धावणे , हा गुरुजींचा प्रेरणादायी गुण !!! म्हणूनच सन 2005 साली डोंगर कोसळून बेघर झालेल्या व वादळाने नेस्तनाबूत झालेल्या लोकांना कपडेलत्ता , अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू घेऊन  गुरुजी सहकार्यांसह वेळास येथे पोहोचतात !!! आपल्या लोकांवर कोसळलेली संकटे पाहून त्यांचे डोळे गहिवरून येतात !!! आलेल्या संकटांशी सामना करून हार न मानता विजयी होतात !!! आपल्या उत्पन्नातील एक तृतीयांश उत्पन्नावर समाजाचा हक्क आहे व तो आपण दिलाच पाहिजे या भावनेतून ते समाजाचे यथासांग पांग फेडतात !!!

   कोरोनाच्या काळात पोसरे गावामध्ये 85 टक्के लोकांना लागण झालेली असताना जवळजवळ दोन लाखाची औषधे गोरगरिबांना  एकता प्रतिष्ठान पोसरे मार्फत ,मोफत देऊन अनेकांना नवसंजीवन मिळवून दिले !!! गावातील अपंग व्यक्तींना आधारस्टिक , व्हीलचेअर , वॉकर यांचे घरोघरी जाऊन सुमारे 90 हजाराचे साहित्य वाटप  हुंबरे परिवाराच्या मार्फत करण्यात आले !!! एकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण , दारूबंदी ,व्यसनमुक्ती सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन, सांस्कृतिक शैक्षणिक , क्रीडा क्षेत्र,आरोग्य विषयक क्षेत्रात भरीव योगदान देऊन गरजवंत लोकांना रक्तदान दिले आहे . याचीच दखल घेऊन एकता प्रतिष्ठान तर्फे समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सन 2021 मध्ये चिपळूण ला महापूर आलेला असताना एकता प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुमारे तीन लाखांचे जीवनावश्य अन्नधान्य किट व वस्तूंचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दिशा महाराष्ट्राची युट्युब चॅनेल च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने त्यांना "आदर्श उपक्रम शिक्षक पुरस्काराने " 2026 ला सन्मानित करण्यात आले .


श्री. हुंबरे यांच्या कर्तृत्वाचा प्रवास केवळ वर्गखोलीपुरता मर्यादित राहिलेला नाही. वेळास, ता. मंडणगड  , आदर्श शाळा उमरोली नं . 1 , आदर्श शाळा पोसरे  गुरववाडी , आदर्श शाळा गोंधळे नं. 1 शाळेतून त्यांनी ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात केली. स्वच्छता, लोकसहभाग आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणत त्यांनी ग्रामस्वच्छतेचा संदेश घराघरांत पोहोचविला.  तीन शाळा आदर्श झाल्या, गावातील शाळेला रोख रक्कम व साहित्य देऊन शैक्षणिक मदत केली . इत्यादी कार्याचा उल्लेखनीय टप्पा त्यांच्या गुणात्मक शैक्षणिक आणि सामाजिक जाणीवेची साक्ष देते !!! गावामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये त्यांचे योगदान फार मोलाचे आहे . एकता प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष , गावातील मंदिराचे सक्रिय सभासद तथा माजी सचिव ,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष  ,राहुल गार्डन सहकारी सोसायटीचे सचिव इत्यादी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहेत .

   त्यांच्या या पुरस्कारामध्ये सर्व पालक , ग्रामस्थ , प्रेमळ विद्यार्थी , सहकारी शिक्षक , कुटुंबामध्ये समर्थ साथ देणारी त्यांची पत्नी सौ.मनिषा हुंबरे मुले दुर्वांक आणि गौरांग सर्व भाऊ कुटुंबीय सदस्य व त्यांच्यावर विश्वास ठेवणारे अधिकारी यांच्या प्रति  ते विनम्रपणे ऋण व्यक्त करतात  !!! हा पुरस्कार  ते सर्वांच्या प्रति समर्पित करतात !!! 


“स्वच्छतेचा मंत्र दिला, गावाला नवी दिशा मिळाली;

शिक्षकाच्या प्रयत्नांना, पुरस्काराची पावती मिळाली.


“शाळा फक्त इमारत नाही, ती संस्कारांची पंढरी;

शिक्षकाच्या प्रयत्नांनी उजळली, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची दारी!”

ग्रामस्वच्छता अभियानापासून ते आदर्श शाळेच्या निर्मितीपर्यंत आणि आजच्या तंत्रज्ञानाधिष्ठित गुणवत्तापूर्ण शिक्षणापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवित त्यांनी शिक्षणासोबत संस्कार, स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची मूल्ये रुजविली.

“ज्ञान दिले, संस्कार दिले, स्वप्नांना दिली भरारी;

अशा शिक्षकाच्या कर्तृत्वाला, आज मिळाली सन्मानाची शिदोरी!”

श्री. विनोद जानू हुंबरे यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ , मित्रपरिवार आणि शिक्षणप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांचा हा पुरस्कार म्हणजे एका शिक्षकाच्या कार्याचा नव्हे, तर शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविणाऱ्या विचारांचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.


Comments