पाटपन्हाळे महाविद्यालयाची औद्योगिक भेट


गुहागर  : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने प्रथम वर्ष वाणिज्य वर्गाची औद्योगिक भेट लांजा या ठिकाणी संपन्न झाली. या भेटीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार यांनी दखल घेतलेले  युवा उद्योजक श्री मिथिलेश देसाई यांच्या प्रोजेक्टला भेट देण्यात आली. त्याप्रसंगी श्री. मिथिलेश देसाई यांनी विद्यार्थ्यांना कोकणातील असणाऱ्या विविध उद्योजकतेच्या संधी कशा आहेत आणि त्याचा वापर आपण कसा करू शकतो हे विविध उदाहरणासह सांगितले. श्री मिथिलेश देसाई यांची राष्ट्रीय पातळीवर जॅकफ्रूट किंग ऑफ इंडिया ओळख झाली आहे.

जगामध्ये फणसाच्या 188 जाती आहेत त्यातील 100 पेक्षा अधिक जाती ह्या त्यांच्या प्रोजेक्टमध्ये आहेत. फणस हा हंगामी असला तरी बारा महिने त्यावर प्रोजेक्ट कसा चालू शकतो हे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये कोकणातील विद्यार्थी बोर्डामध्ये नेहमीच पुढे असतात परंतु उद्योजकतेमध्ये खूप मागे पडतात. नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने कोकण हा पूर्णपणे समृद्ध आहे परंतु त्या संसाधनाचा योग्य पद्धतीनुसार वापर होत नाही त्याचा वापर करून उद्योजकता यशस्वी कशी करता येईल हे त्यांनी सांगितले. 

नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर करून आणि नाविन्यतेचा ध्यास घेऊन योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांना मुंबई पुण्याच्या मागे न लागता गावात राहून देखील चांगल्या पद्धतीने यशस्वी उद्योजक होता येईल असे सांगितले. यशस्वी उद्योजक होण्यासाठी पारंपारिक गोष्टीचा न विचार करता अपारंपारिक घटकाचा विचार करून नवनवीन कौशल्य आत्मसात केल्यास कोणत्याही आव्हानाला सहसा सामोरे जाता येते हे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अंजनारी येथे असणारा आयडियल कॉर्पोरेशन म्हणजेच पूर्वीचे महालक्ष्मी फूड प्रॉडक्ट्स यांनाही विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्याचे मालक श्री योगेश सरपोतदार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाचा प्रवास सांगितला आणि उद्योजकतेमध्ये आपण कोणत्या गोष्टी कराव्यात जेणेकरून आपल्याला यशस्वी उद्योजक होता येईल हे सांगितले. या औद्योगिक भेटीच्या वेळी प्रथम वर्ष वाणिज्य वर्गातील एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी वाणिज्य विभाग व प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. डॉ. प्रवीण सनई आणि प्रा. सुभाष घडशी उपस्थित होते.

Comments