श्रावण : सामाजिक ऐक्य व महिला सक्षमीकरणाचा महिना
श्रावणामध्ये उमटलेले रंग सृष्टीच्या सोहळयाचे रंगा रंगामध्ये न्हाऊन निघाले सृष्टीचे अवतरंग"
चिपळूण : श्रावणामध्ये वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातुन माणसे एकमेकांशी जुळली जातात. पावसाच्या अनवित वर्षावाने सजलेली सृष्टी अतिशय सुंदर दिसते. हा सण आणि महिना सामाजिक दृष्ट्या सुध्दा महत्वाचा आहे. सणांचा राजा म्हणजे श्रावण होय, एकत्र येणे, नाती जपणे आणि समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करायला आपल्याला शिकवते.
श्रावणामध्ये शिवमंदिरात सोमवारी गावोगावी अभिषेक, पुजाअर्चा होते. दहिहंडीच्यावेळी लहान मोठे सर्वजण पर्व यामध्ये सहभाग घेतात. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा उठुन उभा रहायच हे आपल्याला दहिहंडी सण शिकवतो.
बैलपोळा सणा दिवशी शेतकरी आपल्या बैलासोबत बेलपोळा आपलं नातं साजर करतो. नागपंचमीला पर्यावरण आणि प्राणी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होते. या सर्व सणांमधुन आपण सगळे एक आहोत. आणि या सृष्टीचे आपण लेकर असून तिच्या अनंत कृपादृष्टी व प्रेमाची परतफेड करत असतो असतो. आता थोडं श्रावणातील महिला -शक्ती आणि सक्षमीकरण. श्रावण व महिला खूप जवळचं नातं आहे. किंबहुना श्रावणाला महिलांचा महिना म्हटले तर वावगे ठरणार नाही. सुरवात प्रत्येक मंगळवारी होणारी मंगळागौर. मंगळागौर ही महिलांच्या एकत्रीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. नवविवाहित व विवाहित स्त्रिया एकत्र येऊन मंगळागौरीची पुजा करतात, रात्रभर झिम्मा फुगडी, खेळतात, हे फक्त फरमणुक नाही. तर स्त्रिया आपले दुःख विसरून एकमेकींमध्ये आनंद उत्सव साजरा करतात. हा महिलांचा आधारवड असतो. हळदी कुंकुच्या निमित्ताने स्त्रिया एकमेकीच्या घरी जातात, वाण देतात. यामुळे सामाजिक बांधिलकी वाढते. किती सुंदर ती सृष्टी हिरव्यागार शालूने फुलून दिसते. तसेच हिरव्या बांगड्या, मेहंदी, नवीन साडी यामुळे स्त्रियाही खुलून दिसतात.
आजकालू अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातुन श्रावणात पातोळ्या, फराळ बनवून आर्थिक उत्पन्न मिळवतात. यातूनच महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होते. या सणांमुळे महिला व विद्यार्थिनींमध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन आत्मविश्वास वाढतो व कलागुणांना उत्तेजन मिळते. आजच्या धावपळीच्या काळात व मोबाईलच्या जगात लोक एकमेकांपासून दूर गेले आहेत. ते या सणांच्या निमित्ताने एकत्र येतात.
श्रावण आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी शिकवतो. एक म्हणजे एकत्र येणे आणि दुसरं म्हणजे महिलांचा सन्मान करणे. श्रावणात आपली पृथ्वी अगदी नववधुसारखी अतिसुंदर दिसते. म्हणुनच असे बोलावे वाटते की-
श्रावणात फुलन झुलुन सृष्टी सजली
नववधुची कास पकडूनी खुलून गेली.
नदीचे खुळखुळणारे पाणी
गात होते प्रेमाची गाणी
आला आला श्रावण राजा
सर्वार्थाने आनंद पसरून गेला.
लेखिका- डॉ. रोहिणी दिपक ओतारी

Comments
Post a Comment