बाप्पाच्या आगमनाने फुलते ७२ जणांचे एकत्रित कुटुंब
दोणवलीच्या कदम बंधूंची ३५ वर्षांची 'एकता एक्सप्रेस' अविरत सुरूच!
८ चुलते, ७२ माणसं अन् ३ पिढ्या एक अनोखा संगम
संतोष कुळे
चिपळूण : आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीच्या काळात जिथे नाती दुरावत चालली आहेत, तिथे चिपळूण तालुक्यातील दोणवली बामणेवाडी येथील कदम कुटुंबीयांनी एकत्र येऊन एकोप्याची अनोखी परंपरा ३५ वर्षांपासून अविरत जपली आहे. कदम कुटुंबाचे मूळ आधारस्तंभ असलेले शिवाजी धाकटू कदम आणि दौलत धाकटू कदम यांचे कुटुंब आणि त्यात तब्बल आठ चुलते आणि ७२ हून अधिक कुटुंब सदस्य होतात. या सामूहिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी एकाच छताखाली एकत्र येतात, जो आजच्या धावपळीच्या युगात संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश ठरत आहे.
दोणवली बामणेवाडीतील शिवाजी कदम आणि दौलत कदम यांच्या कुटुंबीयांच्या गणेशोत्सवाला यंदाही उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तब्बल ३५ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात आहे. कुटुंबातील आठ चुलते, त्यांची मुले, सुना, नातवंडे अशा सुमारे ७२ सदस्यांचा या उत्सवात सहभाग असतो. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त कुटुंबातील सदस्य विविध ठिकाणी राहत असले तरी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वजण आपल्या मूळ गावी एकत्र येतात.
कदम कुटुंबीयांसाठी गणेशोत्सव म्हणजे वर्षातून एकदा होणारे कुटुंबाचे मोठे स्नेहसंमेलनच होते. गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुटुंबातील सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. घरातील ज्येष्ठ मंडळी मार्गदर्शन करतात, तर तरुण मंडळी सजावट, आरास, पूजाविधी आणि अन्य नियोजनाची जबाबदारी उत्साहाने पार पाडतात. महिला वर्गही विविध धार्मिक कार्यक्रम, नैवेद्य आणि घरगुती तयारीमध्ये सक्रिय सहभाग घेतात. लहान मुलेही गणरायाच्या सेवेत सहभागी होत उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.
या सामूहिक गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तीन पिढ्यांचा एकत्रित सहभाग. ज्येष्ठांच्या अनुभवातून परंपरा पुढील पिढीकडे पोहोचत आहे, तर नव्या पिढीतील सदस्य आधुनिकतेसोबतच आपल्या संस्कृतीची आणि कुटुंबीय परंपरांची नाळ जपण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक संस्कारांसोबतच कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होत आहेत.
विशेष म्हणजे, काळ बदलला तरी या कुटुंबाने आपली ३५ वर्षांची परंपरा खंडित होऊ दिलेली नाही. कुटुंबातील केशव शिवाजी कदम, रघुनाथ शिवाजी कदम, जगन्नाथ शिवाजी कदम, सदाशिव शिवाजी कदम, गणपत दौलत कदम, पांडुरंग दौलत कदम, मारुती दौलत कदम, तुकाराम दौलत कदम हे आठ चुलते असून त्यांनी आपल्या वडिलांची परंपरा पुढे नेली. आता याला त्यांच्या मुलांची आणि नातवंडांची साथ मिळते.
अनेक कुटुंबांमध्ये गणेशोत्सव स्वतंत्रपणे साजरा केला जात असताना कदम बंधूंनी मात्र ‘एकत्र येणे, एकत्र साजरे करणे आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे’ ही भावना कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचा गणेशोत्सव परिसरातील इतर कुटुंबांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत वर्षातून एकदा का होईना, संपूर्ण कुटुंबाने एकत्र यावे, परस्परांतील संवाद वाढावा आणि नात्यांमधील जिव्हाळा कायम राहावा, यासाठी कदम कुटुंबीयांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतो.
तब्बल ३५ वर्षांपासून जपली गेलेली ही परंपरा आगामी पिढ्यांनीही अशीच पुढे न्यावी, हीच कुटुंबातील ज्येष्ठांची भावना आहे.दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबातील आठ चुलते, सुमारे ७२ सदस्य आणि तीन पिढ्यांना एका धाग्यात बांधणारा हा सामूहिक गणेशोत्सव म्हणजे बदलत्या काळातही नाती जपण्याचा सुंदर संदेश देणारा उत्सव ठरला आहे. गणरायाच्या भक्तीसोबतच कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि एकजुटीचा जागर करणारी कदम बंधूंची ही ३५ वर्षांची परंपरा निश्चितच कौतुकास्पद आहे.

Comments
Post a Comment