चिपळूणमध्ये महाभारतातील 'कृष्ण जन्म' देखाव्याची जादू 

वैजी येथील मंगेश भडवळकर यांच्या कल्पकतेला गणेश भक्तांची दाद


    संतोष कुळे 

चिपळूण : कोकणातील गणेशोत्सवात भक्ती आणि श्रद्धेसोबतच देखाव्यांची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. चिपळूणमधील वैजी येथील हरहुन्नरी कलाकार मंगेश वामन भडवळकर यांनी यावर्षी महाभारतातील 'कृष्ण जन्म' आणि गोकुळ लीलेचा जिवंत देखावा साकारत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दहा दिवस गणराया असून त्यांनी तयार केलेला  अनोख्या आणि कलात्मक देखाव्याला पाहण्यासाठी गणेश भक्तांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी होत आहे. 

 दरवर्षी भडवळकर कुटुंबिय विविध प्रकारचे देखावे सादर करत असतात. यातून समाजाला ते जनजागृतीपर संदेश देत असतात. मंगेश वामन भडवळकर यांच्या कल्पकतेतून दरवर्षी नवीन कलाकृती लोकांना अनुभवास मिळते. त्यांनी स्त्रीभ्रूणहत्या थांबली पाहिजे, पर्यावरण वाचवा, महीला सुरक्षा, जिल्हा परिषद शाळा वाचवा अशा प्रकारचे सामाजिक संदेश आणि जनजागृती करणारे देखावे बनवून त्यांनी अनेक पारितोषिके मिळवले आहेत.

यावर्षी त्यांनी महाभारतातील कृष्ण जन्म देखावा साकारून  सर्वांचे लक्ष वेधले आहे.  या देखाव्यात त्यांनी देवकीच्या वरतीमधील होणारी आकाशवाणी, त्यानंतर कंसाने त्यांना कैद करून बंदिशाळेत ठेवणे, नंतर कृष्ण जन्म आणि पावसातून कृष्णाला गोकुळात नेण्याचे सुन्दर दृश्य देखाव्यात साकारले आहे. त्यानंतर राधे संगती वृंदावनातील रास क्रीडा हा सुध्दा प्रसंग त्यांनी दाखवून गणेश भक्तांची कौतुकाची थाप मिळवली आहे.  

अनेक सजावटी स्पर्धेत मंगेश यांनी सहभाग घेऊन पारितोषिक मिळवले आहेत. असा हा हरहुन्नरी कलाकार असून त्याला देखावा साकारताना कुटुंबाची साथ नेहमीच लागते. त्यांचे वडील सुद्धा एक उत्तम कलाकार आहेत. वडिलांचे संस्कार आणि पाठबळ हेच मंगेश यांची यशाची शिदोरी आहे. त्यांची भडवलकरवाडीच कलाकारांची वाडी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सर्वच कुटुंब गणेश उत्सवात अगदी मनापासून मेहनत घेत गणेश भक्ती आणि श्रद्धा जपतात.

Comments