मेटे भोईवाडी  येथे  पारंपरिक वारकरी वेशभूषेत रंगली श्री गौरी गणेश विसर्जन मिरवणूक

गणेश भक्तांनी केला डिजेला रामराम



चिपळूण : सध्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश डीजेचा बोलबाला वाढत असताना, खेडमधील मेटे भोईवाडी येथील ‘जय बजरंगबली मित्रमंडळा’ने मात्र एक कौतुकास्पद पायंडा पाडला आहे. डीजेच्या दणदणाताऐवजी टाळ मृदंगाचा गजर, संत वेशभूषा आणि पारंपरिक वारकरी संस्कृतीच्या जयघोषात यंदाची श्री गौरी-गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. "परंपरा जपूया, संस्कृती पुढे नेऊया" असा संदेश देणारा हा अनोखा उपक्रम संपूर्ण परिसरात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरला आहे.

या विसर्जन मिरवणुकीत वारकरी वेशभूषा, दिंडी, टाळ-मृदंगाचा गजर आणि श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. मिरवणुकीमध्ये संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई तसेच वासुदेव आदी संतपरंपरेशी संबंधित पात्रांनी सहभाग घेतला.

मंडळातील महिला व पुरुषांसह लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत पारंपरिक वेशभूषेत मिरवणुकीची शोभा वाढवली. विविध फलक, भगवे ध्वज आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषेमुळे मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

आधुनिकतेच्या युगात पारंपरिक लोककला, वारकरी संस्कृती आणि भक्तीपरंपरा जपण्याचा मंडळाचा हा उपक्रम विशेष ठरला. डीजेच्या मोठ्या आवाजापेक्षा भक्ती, संस्कृती आणि परंपरेला प्राधान्य देत काढलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. या अभिनव आणि संस्कृती जपणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

“परंपरा जपूया, संस्कृती पुढे नेऊया” असा संदेश देणारी जय बजरंगबली मित्रमंडळाची ही श्री गौरी-गणेश विसर्जन मिरवणूक यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली.

Comments