शिवखूर्दच्या 'कमळ ग्रामसंघा'ची वार्षिक सभा उत्साहात

महिलांच्या शेती, बचत आणि पाणी फाऊंडेशनमधील सहभागाचे कौतुक

​


खेड : तालुक्यातील ​शिवखूर्द येथील 'कमळ ग्रामसंघा'अंतर्गत येणाऱ्या दहा महिला बचत गटांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच  सौ. ईश्वरी कणेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या सभेत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासह भातशेती, नाचणी व परसबाग लागवडीचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच पाणी फाऊंडेशन स्पर्धेत सहभागी झालेल्या गटांना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या.

​​शिवखूर्द गावातील कमळ ग्रामसंघाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महिलांच्या उपस्थितीत करण्यात आली.

​पाणी फाउंडेशन स्पर्धेत हिरिरीने भाग घेतलेल्या राजमाता व जिजाऊ बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महिलांच्या या एकजुटीचे आणि कष्टाळू वृत्तीचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले.

​​या सभेला मार्गदर्शन करताना अधिकारी श्री. मर्चेडे व श्री. बागुल  यांनी महिला बचत गटांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याविषयी मोलाची माहिती दिली. तसेच भैरी देवस्थानचे अध्यक्ष श्री. प्रकाश कुळे गुरुजी यांनी महिलांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. मुख्याध्यापक श्री. कदम गुरुजी व श्री. विलास डफळे यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या प्रगतीमुळे गावाची मान उंचावल्याचे सांगितले.

​या वेळी श्री. अनंत कुळे, श्री. अनिल डफळे, पोलीस पाटील श्री. धीरज डफळे, श्री. लहू नरळकर, श्री. सचिन पास्टे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या यशस्वीतेसाठी कमळ ग्रामसंघाच्या सर्व महिलांनी अथक परिश्रम घेतले. सभेचे सूत्रसंचलन सचिव सौ. तन्वी नरळकर व ग्रामसखी सौ. रुणाली नरळकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.

Comments