चिपळूण पोसरे येथे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने बांधला बंधारा
युवकांचे लाभले अनमोल सहकार्य
चिपळूण : यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पाणी अडवा..पाणी जिरवा या शासनाच्या उपक्रमांतर्गत पोसरे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ठिकाण गोठणी येथील ओढ्यावर सुमारे १७ फूट लांब आणि ४ फूट उंचीचा दगड मातीचा भक्कम बंधारा बांधण्यात आला. यामध्ये युवकांचे योगदान महत्वाचे होते.
निसर्गात झालेले बदल आणि बदलते पर्यावरण यामुळे निश्चितच धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पावसाने तर आपला लहरीपणा दाखवून दिला. त्यामुळे भात शेती आणि पाणी टंचाई या मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. पिण्यासाठी पाणी मिळणारा नाही अशी अवस्था आताच होत आहे.
पाणी अडवा..पाणी जिरवा या उपक्रमातून आणि स्वतःची जबाबदारी ओळखत चिपळूण पोसरे येथील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत यांनी मिळून दगड मातीचा भक्कम बंधारा घातला आहे. यासाठी लागणारे साहित्यही युवकांनी स्वतः उपलब्ध करून दिले. सुमारे १७ फूट लांब आणि चार फूट उंचीचा बंधारा गोठणी शेजारील ओढ्यावर बांधण्यात आला.
यासाठी गावातील हरहुनरी युवक निलेश पोसनाक यांनी संकल्पना मांडत हा बंधारा बांधण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रतिक्रियेला साद देत गावातील ग्रामस्थ, मुंबईमधील काही ग्रामस्थ यांनी बंधारा बांधण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी सरपंच महेश आदवडे, ग्रामसेवक सुभाष म्हादे,पांडुरंग पोसनाक, शैलेश खाडे , प्रमोद आदवडे, नितेश खाडे, अमर पाडेकर, श्रीकांत चांदिवडे, मंगेश पाडेकर, सर्फराज मामतूले, अजित मेस्त्री, अंश शैलेश खाडे, शैलेश पोसनाक, निलेश पोसनाक आणि सुशांत पाटील यांनी परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment