पालवण पाणी कमिटी अध्यक्षपदी भरत सावर्डेकर यांची बिनविरोध निवड,
पहिल्याच सभेतच पारदर्शकतेचा आदर्श निर्णय
संतोष कुळे
चिपळूण: तालुक्यातील पालवण गावच्या पाणी पुरवठा कमिटीच्या अध्यक्षपदी भरत मारुती सावर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचे सामाजिक कार्य आणि प्रशासकीय अभ्यास यामुळे निश्चितच पालवण पाणी पुरवठा कमिटीचे काम उत्तम होणार आहे. त्यांनी पहिल्याच सभेत एक महत्वपूर्ण निर्णय घेत स्वतःमधील कार्यक्षमता दाखविली आहे.
गावच्या पाणी पुरवठ्याची आणि विकासाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी भरत सावर्डेकर त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या कामाचा दांडगा अनुभव, नेतृत्वगुण आणि समाजहित जपण्याची वृत्ती याचा बळावर श्री. सावर्डेकर गावातील पाणी व्यवस्थापनाचे प्रश्न अत्यंत सक्षमपणे आणि यशस्वीपणे मार्गी लावतील, हा सर्व ग्रामस्थांना पूर्ण विश्वास आहे.
सध्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि उन्हाळ्याची दाहकता पाहता, संपूर्ण गावासाठी पाण्याचे नियोजन करणे हे एक अत्यंत आव्हानात्मक काम आहे. अशा कठीण काळामध्ये गावच्या पाणी पुरवठ्याची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. यासाठी आपण नियोजन बद्ध काम करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत सावर्डेकर यांनी सांगितले.पालवण गावच्या पाणी कमिटी अध्यक्षांनी पहिल्याच सभेत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्वतःमधील कार्यक्षमता दाखविली. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात पाणी व्यवस्थापन व तक्रार नोंदवही अद्यावत करण्यात आली आहे
*ग्रामस्थांसाठी 'सुचना, संकल्पना व तक्रार नोंदवही*
एखाद्या वाडीला पाणी न मिळणे, पाईपलाईन फुटणे, किंवा अशुद्ध पाणी येणे यासारख्या तक्रारींसाठी नोंदवही आहे. त्यात तक्रारदाराचे नाव, वाडी, तारीख आणि समस्येचे स्वरूप लिहिले जाईल.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी किंवा पाणी साठवणुकीसाठी ग्रामस्थांकडे चांगल्या कल्पना असू शकतात. त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना वाव देण्यासाठी नोंदवही आहे.
पाणी सोडताना कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी (उदा. वीज पुरवठा खंडित होणे, मोटार बिघडणे, काही ठिकाणी होणारी पाण्याची चोरी किंवा हुज्जत घालणे) कर्मचाऱ्यांनी लेखी नोंदवाव्यात, जेणेकरून कमिटी त्यांना कायदेशीर व प्रशासकीय संरक्षण निर्णय घेऊ शकेल. कोणत्या वाडीला किती पाणी दिले याची लेखी नोंद जाहीर असल्याने वाड्या-वाड्यांमधील पाण्याचे वाद कायमचे मिटतील. कर्मचाऱ्यांना त्यांचे काम चोख बजावता येईल आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे सोपे होईल. गावातील पाणी नियोजनात ग्रामस्थांचा थेट सहभाग वाढल्यामुळे गावात एकोपा निर्माण होईल.
पालवण पाणी कमिटी अध्यक्षांचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी ही एक उत्तम 'रोल मॉडेल' (आदर्श) ठरू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यात असा निर्णय घेणारी पालवण ग्रामपंचायत सर्वप्रथम ग्रामपंचायत आहे. या पारदर्शक कारभारासाठी अध्यक्षांचे, सदस्यांचे , आणि संपूर्ण पालवण ग्रामपंचायतीचे सर्वांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी उपाध्यक्ष प्रमोद हरिचंद्र भुवड, ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घाडगे, ग्रा.प. कर्मचारी विश्वंभर सुर्वे, श्री.विशाल भुवड, श्री.संभाजी पानगले सदस्य गणेश शंकर विचारे, विजय भाग्या सावर्डेकर, दत्तप्रसाद कारेकर, गणपत भाऊ साठले, समीर सुर्वे, राजेश भुवड, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment