मचूळ पाण्याच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक; २५ नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम!

गोवळकोट, पेठमाप, उक्ताडसह चार परिसरांतील पाणीप्रश्न सोडविण्याचे प्रशासनाचे आश्वासन; काँग्रेसचे उपोषण तात्पुरते स्थगित




        संतोष कुळे 

चिपळूण : चिपळूण नगरपरिषद हद्दीतील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड परिसरातील नागरिकांना गेल्या काही काळापासून खारे, मचूळ आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पिण्यासाठी योग्य व शुद्ध पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर समस्येविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणारे उपोषण काँग्रेसच्या नगरसेवकांनी तात्पुरते स्थगित केले आहे.

या पाणीप्रश्नाबाबत काँग्रेस पक्षाच्या नगरपरिषदेतील गटनेत्यांसह नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या सभागृहात सातत्याने आवाज उठविला होता. नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, समस्येवर ठोस तोडगा न निघाल्याने अखेर १७ नोव्हेंबरपासून उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने १८ नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये पेठमाप परिसरात नवीन वितरण वाहिनी टाकणे, उक्ताड परिसरातील पाणीपुरवठ्याचे पुनर्नियोजन करणे, गोवळकोट परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणे आणि आवश्यक दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना करणे आदी बाबींचा समावेश आहे. तसेच नगराध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन २५ नोव्हेंबरपर्यंत चारही परिसरांतील पाण्याचा प्रश्न मार्गी लावून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिले.

प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या मागणीला मिळालेल्या प्रतिसादाचा विचार करून काँग्रेसच्या नगरसेवकांनी सध्या उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही स्थगिती म्हणजे आंदोलन मागे घेतलेले नसून प्रशासनाला दिलेली संधी आहे, अशी भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली आहे.

दिलेल्या मुदतीत पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास चिपळूण नगरपरिषदेतील काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीशी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्ण ताकदीनिशी उभी राहील. नागरिकांच्या हक्कासाठी पुन्हा सुरू होणाऱ्या उपोषणाला आणि आंदोलनाला अधिक व्यापक व तीव्र स्वरूप दिले जाईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

दरम्यान, गोवळकोट येथील मुख्य पाण्याच्या टाकीची शेवटची स्वच्छता कधी करण्यात आली, तसेच किती कालावधीनंतर या टाकीची स्वच्छता केली जाते, याची माहितीही प्रशासनाकडे मागण्यात आली आहे. संबंधित भागातील पाण्याची गुणवत्ता तपासून मचूळ पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करावी आणि नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक सुरेश कातकर, महिला चिपळूण तालुकाध्यक्ष सौ. निर्मला जाधव, खेड तालुकाध्यक्षा सौ. राबिया जसनाईक, नासिर जसनाईक, चिपळूण नगरपरिषदेचे नगरसेवक तथा गटनेते साजिद सरगरोह, नगरसेविका सौ. सफा गोठे, मिस्बाह नाखुदा, माजी नगरसेवक सुरेश राऊत, चिपळूण शहराध्यक्ष कैसर देसाई, डॉ. सरफराज गोठे, संजय जाधव, सुनील खेडेकर, अजित शिंदे, रेश्मा टाकळे आदी उपस्थित होते.

Comments