कोकणातील प्रकल्प आणि खोतीविरोधात वंचित बहुजन आघाडी आंदोलन उभारणार : राजेंद्र पातोडे
चिपळूण येथील पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष यांनी दिली माहिती
संतोष कुळे
चिपळूण, : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कोकणचा कॅलीफोर्नीया करण्याच्या घोषणा दिल्या मात्र तो झाला नाही. सत्ताधारी सरकारने विकासाच्या नावाखाली कोकणावर विनाशकारी औष्णीक प्रकल्प लादले आहेत. या प्रस्तावीत प्रकल्पांना वंचीत बहूजन आघाडीचा विरोध असून आगामी काळात या विरोधात जनआंदोलन उभारणार आहोत. तसेच याविरोधात न्यायालयातही धाव घेणार असल्याचे माहिती वंचीत बहूजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
शहरातील ब्राम्हण सहायक संघाच्या सभागृहात वंचीत बहूजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभा प्रचार बैठक आणि कोकण विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पातोडे म्हणाले, राज्यभरात संघटनेची संघटनात्मक बांधणी जोमाने सुरू आहे. राज्यात प्रथमच बॅलेट पेपरवर निवडणूका घेऊन पक्षाची राज्य कार्यकारीणी निवडण्यात आली. सध्या राज्यभरात विभाग निहाय आढावा बैठका घेऊन संघटनेची बांधणी सुरू आहे. विविध राजकीय पक्षांनी नेहमीच कोकणचा कॅलीफोर्नीया करण्याच्या घोषणा दिल्या. मात्र कोकणचा अपेक्षीत विकास झाला नाही. विकासाच्या नावाखाली कोकणात विनाशकारी प्रदूषणकारी प्रकल्प कोकणवासीयांच्या माथी लादले जात आहेत. त्याविरोधात आम्ही तिव्र लढा देणार आहोत. या प्रकल्पांचा अभ्यास करून न्यायालयातही धाव घेणार आहोत. कोकणवासीयांच्या सहभागातून आगामी काळात जनआंदोलन उभारले जाईल.
कोकणातील खोती पद्धत अद्यापही बंद झालेली नाही. खोतीची पाळेमुळे अजूनही जिवंत आहेत. यामुळे कोकणातील सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. यासाठी आगामी काळात वंचीत बहूजन आघाडीच्या वतीने कोकणात खोती विरोधी परिषद घेऊन जनआंदोलन उभारणार आहोत. मुंबई दादर येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २५ नोहेंबर रोजी संवीधान सन्मान सभा घेण्यात येणार आहे. या सभेला किमान चार ते पाच लाख नागरिक उपस्थित राहतील. महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेला ९९ वर्षे पुर्ण होत असून वंचीत बहूजन आघाडी हा दिवस स्त्री मुक्ती दिन साजरा करणार आहे. पुढील वर्षी १०० वर्षे पुर्ण होत असून महाड येथे शतकोत्तर महोत्सव साजरा करणार आहोत.
यावेळी पक्षाचे महासचिव सोमनाथ साळुंके, ठाणे जिल्हा निरीक्षक तथा राज्य कमिटी पदाधिकारी अरुण जाधव, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक डोके, नांदेड जिल्हा निरीक्षक तथा राज्य कमिटी पदाधिकारी सारंग थोरात, बुलढाणा, जालना जिल्हा निरीक्षक तथा राज्य कमिटी पदाधिकारी नागोराव पांचाळ, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तानाजी कांबळे, सल्लागार काका जोशी, विरेशी बेठकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, प्रमुख सल्लागार श्रीधर सकपाळ, तालुका अध्यक्ष चिपळूण संदीप गमरे, सुनील जाधव, अतिश घाडगे, सादीक काजी (उत्तर जिल्हा उपाध्यक्ष), कामगार नेते विनोद कदम, कामगार नेते महेश सावंत , कामगार नेते सुशांत जाधव, राजेश मोहिते तालुका उपाध्यक्ष चिपळूण राजेश मोहिते, महासचिव चिपळूण तालुका संदेश कदम, राजेश कांबळे रत्नागिरी तालुका अध्यक्ष राजेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments
Post a Comment